डोंबिवली ( शंकर जाधव ): डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात रस्ते काँक्रीटीकरण काम चालू असून फक्त ठराविक रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. तेही चुकीच्या नियोजनामुळे पुन्हा खोदावे लागत आहेत. निवासी भागातील अनेक महत्त्वाचे अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार नसल्याचे समजल्याने रविवारी निवासी भागातील मॉडेल कॉलेज भागातील भाजी गल्ली रोडवर येथील सुमारे १५० नागरिकांनी तोंडावर मास्क बांधून हातात फलक घेऊन मूक आंदोलन केले. यात ज्येष्ठ नागरिक, महिला,पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवासी भागातील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी करीत होते.
एमआयडीसी निवासी मधील सर्व रस्ते काँक्रीट करण्यात येतील अशी फलकबाजी यापूर्वी करण्यात आली होती. पण आता फक्त ठराविक रस्ते काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे समजल्याने येथील नागरिकांत मोठा असंतोष पसरला असून त्यात नवीन बनविलेल्या काँक्रीट रस्त्यावर एमआयडीसी कडून नवीन सांडपाणी वाहिन्या/चेंबर टाकण्यात येणार असल्याने हे नवीन रस्ते दोन्ही बाजूंनी तोडण्यात येणार आहेत. आता यापुढे पायवाट साठी पेवरब्लॉक टाकण्याचे काम एमआयडीसीच्या सांगण्यानुसार एमएमआरडीएचा ठेकेदाराने बंद केले आहे.
वीज/पाणी/सांडपाणी वाहिन्या आणि महावितरणचे डीपी बॉक्स, ट्रान्सफॉर्मर हे काही ठिकाणी रस्त्यांच्या मध्ये आल्याने ते दुरुस्ती करतेवेळी नवीन काँक्रीट रस्ते तोडावे लागत आहेत. एकंदर या सर्व भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक वैतागले असून त्यामुळे येथील नागरिक प्रशासनाचा विरोधात रस्त्यावर उतरले होते. या सर्व समस्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना यापूर्वी अनेकदा कळविण्यात आले होते शिवाय पत्रव्यवहारही करण्यात आला होता. आता पुन्हा येथील सर्व समस्यांसाठी नागरिकांच्या सह्यानिशी पत्र देण्यात येणार आहे. जर त्यातूनही येथील समस्यांची दखल घेतली गेली नाही तर एक भव्य मोठा मोर्चा नागरिकांतर्फे प्रशासनावर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सागर पाटील, मंदार स्वर्गे, मनोहर पाटील, राजु नलावडे, श्वेता मयेकर यांनी या मूक आंदोलनासाठी विशेष मेहनत घेतली.


