मृतदेह ड्रममध्ये टाकून जंगलात फेकला, पती अटकेत
कल्याण ( शंकर जाधव ) : पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी टिटवाळा येथे उघडकीस आली आहे. हत्या करणाऱ्या टिटवाळा पोलिसांनी अटक करून गजाआड केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मैनुद्दीन अन्सारी असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. मैनुद्दीन याने पत्नी अलिमुन अन्सारी हिचा गळा आवळल्यानंतर कुदळीने तिची हत्या केली. मैनुद्दीनने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह ड्रममध्ये टाकून नालिंदी गावच्या जंगलात फेकून दिला. मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने रस्त्याने जाणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेचा गळा दाबून नंतर कुदळीने कापण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अलीमुन अन्सारी याचे २०१२ साली लग्न झाले होते. दोघांना अकरा वर्षांचा मुलगा आहे. मारेकरी पती रिक्षा घेण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करत होता. नुकतेच पालकांनीही ८० हजार रुपये दिले. त्यानंतरही मैनुद्दीन पत्नीकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. घटनेच्या दिवशी पती-पत्नीमध्ये पैशावरून भांडण झाले होते. अखेर पोलिसांनी मारेकरी पती मैनुद्दीन अन्सारी याला अटक केली.