KDMC Ring Road : रस्त्यात बाधित होणाऱ्या जमीन मालकांना चार पट टीडीआर देण्याची मागणी

 


युवा सेनेचे सचिव दिपेश म्हात्रे यांचे प्रयत्न

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण -डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विकास प्रकल्प म्हणजे बाह्यवळण रस्ता (रिंग रोड ) या प्रकल्पासाठी जमीन संपादित करणे आवश्यक आहे. टप्पा क्र. ३ मधील दुर्गाडी ते मोठागाव या सुमारे ३.७५ कि.मी.लांबीच्या रस्त्यासाठी लागणारी ७० टक्के जमीन संपादित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मोठागाव ते देवीचा पाडा दरम्यान असलेली ३० टक्के जमीन संपादित करणे बाकी आहे. या भागात बाधित होणाऱ्या स्थानिक नागरिकांनी रोख मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने आर्थिक मोबदल्या ऐवजी दोन पट टीडीआर देण्यात येत आहे. मात्र प्रचलित नियमानुसार सद्या दिला जाणारा दोन पट टीडीआर ( हस्तांतरणीय विकास हक्क) सध्याच्या बाजार भावाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने स्थानिक जमीन मालकांनी रविवारी देवीचा पाडा येथील चकाचक मंदिर आवारात सभा घेतली होती.टीडीआर नको मोबदला द्यावा अशी मागणी केली होती.आता त्यावर संपादित करावयाच्या जमिनींचा योग्य मोबदला म्हणून चार पट टी.डी.आर.देण्यात यावा, अशी मागणी युवा सेनेचे सचिव दिपेश म्हात्रे (Dipesh Mhatre)  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) व खा.डॉ.श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant shinde)  यांच्याकडे केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

      कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी नवीन रस्ते विकसित होत आहेत .त्या रस्त्यांसाठी स्थानिक नागरिकांच्या जमिनी संपादित कराव्या लागत आहेत .त्या बाधीत जमीनधारकांना योग्य तो मोबदला मिळण्याची मागणी जोर धरू लागली. आता जमीन मालकांबाबत सरकार सकारात्मक असून जागेच्या बदल्यात दोन पट टीडीआर ऐवजी चारपट टीडीआर देण्याच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एमएमआरडीचे आयुक्त संजय मुखर्जी ,खा. डॉ.श्रीकांत शिंदे , केडीएमसी आयुक्त इंदुरानी जाखड  यांनी अनुकुलता दर्शविली आहे. यामध्ये मार्ग काढून तातडीने निर्णय घेण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post