'बाहुबली' च्या अभूतपूर्व यशानंतर प्रभासचा 'सालार : पार्ट १ सीझफायर'ने बाॅक्स ऑफिसवर आग लावली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. प्रभासचा हा क्राईम थ्रिलर चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. 'सालार' ने रिलीजच्या सातव्या दिवशी १३.५० कोटी रुपये कमवले आहेत. यासह 'सालार'चे एकूण ७ दिवसांचे कलेक्शन आता ३०८.९० कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाने सहाव्या दिवशी विदेशात १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
सालार' २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करून कल्ला केला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९०.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग घेणारा चित्रपट ठरला आहे. 'सालार'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ५६.३५ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ६२.०५ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ४६.३० कोटी रुपये, पाचव्या दिवशी २४.९० कोटी आणि सहाव्या दिवशी १५.१० कोटी रुपये कमावले आहेत. आता या चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
२५० कोटी बजेटमध्ये बनलेल्या सालार चित्रपटाने जगभर ४६५ कोटींची कमाई केली आहे. प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज करण्यात आला आहे. प्रभासच्या या चित्रपटाच्या कमाईने दक्षिण भारतातील अनेक बंपर चित्रपटांना टक्कर दिली आहे. ९०.७ कोटींच्या ओपनिंगसह या चित्रपटाने प्रभासच्या मागील ब्लॉकबस्टर 'बाहुबली २'लाही मागे टाकले आहे.
'सालार' चित्रपटात प्रभास एका दमदार भूमिकेत दिसला असून त्याच्या ॲक्शन सीन्सचे खूप कौतुक होत आहे. याशिवाय या चित्रपटात श्रुती हासन, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी, टिनू आनंद आणि जगपती बाबू या कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट आपल्या मेगा अॅक्शनमुळे आणि दोन मित्रांच्या शत्रू बनण्याच्या कथेमुळे खूप चर्चेत आहे.