दिवा, (आरती मुळीक परब) : दिवा शहरात होणाऱ्या दिवा महोत्सवाचे ह.भ.प श्री. चेतन ज्ञानेश्वर म्हात्रे महाराज यांच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झालेल्या देसाई गावच्या प्रेम देवकर याचा विशेष अतिथी म्हणून सन्मान करण्यात आला. दिवा शहरात ज्या प्रमाणात विकास काम होत आहेत तितकेच या शहराचे सांस्कृतिकपण जपण्याची देखील गरज आहे, महोत्सवाच्या माध्यमातून ती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असल्याचे महाराज म्हणाले.
शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवा महोत्सवाचे हे पंधरावं वर्ष आहे. या दिवा महोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली असून ३० डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. यंदाच्या दिवा महोत्सवाला नागरिकांचा तसेच विक्रेते, खरेदीदारांचा पहिल्या दिवसापासून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, दिवा गुणिजन, दिवा गौरव, दिवा भूषण, आदर्श माता, आदर्श शिक्षक, निबंध स्पर्धा, घरगुती व सार्वजनिक गणेश दर्शन सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण, भजन, गायन, पैठणीसाठी लकी ड्रॉ या सर्व माध्यमातून जास्तीत जास्त दिवावासीयांना या महोत्सवाशी जोडण्याचे काम केले जाते, असे मुख्य संयोजक, शिवसेना शहर प्रमुख, उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला यावर्षी अनेक मान्यवर भेट देणार आहेत. याशिवाय दिनांक २९ डिसेंबर रोजी आगरी कोळी गाण्यांचा धमाका असलेला ऑर्केस्ट्रा व महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३० डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळेस दिवा महोत्सव गर्दीचा नवा उच्चांक गाठणार, असा आशावाद रमाकांत मढवी यांनी व्यक्त केला आहे.
हा महोत्सव यशस्वी होण्याकरीता धर्मवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष, विभाग प्रमुख उमेश भगत, शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश पाटील, गणेश मुंडे, अँड.आदेश भगत, नगरसेवक अमर पाटील, दिपाली भगत, दीपक जाधव, दर्शना म्हात्रे, सुनीता मुंडे, तसेच विभाग प्रमुख गुरुनाथ पाटील, विनोद मढवी, निलेश पाटील, भालचंद्र भगत, शशिकांत पाटील, जगदीश भंडारी, राजेश पाटील, सचिन चौबे व सर्व उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख व पदाधिकारी मेहनत घेत आहेत. नागरिकांनी देखील या महोत्सवाला भेट देऊन महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.