कल्याण स्टेशन परिसरात रिक्षाचालकांचे आंदोलन

कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर दुपारच्या सुमारास रिक्षाचालकांनी आंदोलन करून वाहतूक पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिसांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सांगितले.काही वेळ परिसरातील वातावरण तापले असताना स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.वाहतुकीच्या मार्गातील बदलामुळे रिक्षाचालकांनी आंदोलन केले होते.

     कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत उड्डान पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडी होत आहे. ही वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गात बदल केला असून काही रस्ते नो एन्ट्री तर काही रस्ते वन वे केले आहेत. वाहतुकीस अडचणी येत असल्याने स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा बंद करून आंदोलन केले.याची माहिती मिळताच कल्याण वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संतप्त रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला असता बने यांनी कायदा हातात न घेता उपप्रादेशिक परिवहन विभागाशी चर्चा करण्यास सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post