नवी दिल्ली: ७५ व्या प्रजासत्ताक पूर्व संख्येला शासकीय पुरस्काराचे वितरण केले जाते. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) ३७ विविध पोलीस आणि अग्निशमन सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांना उत्कृष्ट सेवेसाठी हे पदक प्रदान करण्यात आले आहे. मनोज शर्मा यांना गुणवंत सेवा पदक मिळाले आहे. त्यांच्या जीवनावर '१२वी फेल' हे पुस्तक लिहिले गेले आणि नुकताच त्यांच्यावर '१२वी फेल' हा चित्रपटही बनला, जो खूप गाजला.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, महाराष्ट्र केडरचे २००५ बॅचचे आयपीएस अधिकारी मनोज शर्मा, त्यांचे बॅचमेट बिहार केडरचे जितेंद्र राणा आणि इतर काही अधिकाऱ्यांना गुणवंत सेवा पदक (MSM) प्रदान करण्यात आले.
मनोज शर्मा आणि जितेंद्र राणा हे दोघेही सीआयएसएफ अधिकारी आहेत. दोन्ही अधिकारी एव्हिएशन सिक्युरिटी विंग (ASG) मध्ये तैनात आहेत. मनोज शर्मा मुंबई विमानतळावर CISF युनिटचे मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी म्हणून प्रमुख आहेत आणि जितेंद्र राणा दिल्ली विमानतळावर त्याच पदावर तैनात आहेत.
विधू विनोद चोप्रा यांनी मनोज शर्मा यांच्या जीवनावर '12वी फेल' हा चित्रपट बनवला आहे. यापूर्वी लेखक अनुराग पाठक यांनी '12वी फेल' हे पुस्तक लिहिले होते, जे सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबरीपैकी एक आहे. या चित्रपटात मनोज शर्मा आणि त्यांची पत्नी IRS अधिकारी श्रद्धा जोशी यांची कथा आहे.