दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा

 


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी

ठाणे : मुंब्रा स्थानकात सोमवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी लोकल अपघातानंतर परिसरातील रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे “दिवा ते सीएसएमटी जलद लोकल” सुरु करण्याची ठाम मागणी केली आहे.

मुंब्रा स्थानकाच्या जवळील वळणावर हा अपघात घडला. अप आणि डाऊन लोकल समोरासमोर जात असताना काही प्रवासी गाडीखाली पडल्याचे सांगण्यात येते. जखमींना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात आले. यापैकी एकाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. दोन गंभीर जखमींवर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित सात जखमींवर धोका टळला असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.

घटनास्थळी भेट देत जखमींची विचारपूस केल्यानंतर डॉ. शिंदे म्हणाले, “दिवा-सीएसएमटी जलद लोकलची तातडीने गरज आहे.” कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, ठाणे या मार्गावर प्रचंड प्रवासीसंख्या असून, यामुळे लोकल ट्रेनमध्ये अत्याधिक गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी आणि अपघातांना आळा बसण्यासाठी जलद लोकल चालवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.


 “ठाणे-कल्याण पाचवी व सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात गाड्यांची संख्या वाढली आहे. मात्र, या मार्गिकेचा विस्तार सीएसएमटीपर्यंत झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या कामावर रेल्वे प्रशासन काम करत आहे आणि लवकरच अधिक फेर्‍या चालवता येतील, अशी अपेक्षा खासदार डॉ. शिंदेंनी व्यक्त केली. 

डॉ. शिंदे यांनी सांगितले की, कल्याणच्या पुढे तिसरी व चौथी मार्गिका उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. या कामासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरु असून, यामुळे रेल्वे मार्गावरचा दबाव कमी होईल. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता १२ डब्यांच्या लोकल गाड्यांना १५ डब्यांमध्ये रूपांतरित करण्याचीही गरज त्यांनी बोलून दाखवली.

या बैठकीत शिवसेनेचे राज्यसभा खासदार नरेश म्हस्के, स्थानिक पदाधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दिवा-सीएसएमटी जलद लोकल ही मागणी आता स्थानिक प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा बनली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post