बेशिस्त रिक्षाचालक, वाहनचालकांवर कारवाईसाठी दिवा मनसेने वाहतूक पोलिसांना निवेदन

 



दिवा,  (आरती मुळीक परब) :  दिवा शहरातील आणि स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आज मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांची भेट घेतली. 
बेशिस्त रिक्षाचालक, वाहन चालकांवर कारवाई  करण्यासाठी दिवा मनसेने वाहतूक पोलिसांना त्यावेळी निवेदन दिले.

दिवा - शीळ रस्त्यावरील दिवा चौक (पूर्व) ते दिवा रेल्वे फाटका पर्यंतची संपूर्ण वाहतूक व्यवस्था ही रोज कोलमडलेली असते. दिवा चौकात वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलीस उपलब्ध असला तरी दिवा रेल्वे फाटका जवळ बेशिस्त रिक्षा आणि वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी रोज होते. तसेच दिवा स्टेशन परिसर हा बेशिस्त रिक्षाचालकांनी अक्षरशः व्यापून टाकलेला आहे. तर रेल्वे पादचारी पुलाच्या समोर वाकड्या तिकड्या रिक्षा उभ्या केल्या जातात, ज्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडणे जिकरीचे होते. त्याशिवाय मनमानी पद्धतीने कुठेही रिक्षा उभ्या करणे, रिक्षा रांगेत न लावणे, बॅच किंवा गणवेश परिधान न करणे, विना परवाना रिक्षा चालवणे, मोडकळीस आलेल्या, खराब झालेल्या (स्क्रॅप) रिक्षांमधून प्रवाशांची वाहतूक करणे, जवळच्या ठिकाणची भाडी नाकारणे, असे प्रकार दिवा शहरात सर्रास सुरू आहेत. त्यामुळे अशा रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिवा मनसे कडून करण्यात आलेली आहे.

सोबतच दिवा शहरातील वाहतुकीचे योग्य नियमन केल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असेही मनसेने आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच या फाटका जवळील वाहतूक कोंडीमुळे मध्य रेल्वेवरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. या वाहतूक कोंडीने दिवा पश्चिमेतून येणाऱ्या गाड्या अडवल्या जातात. त्यामुळे मध्य रेल्वेचे ही वेळापत्रक ही कोलमडते आहे. यावेळी त्यांच्या सोबत शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील आणि उपविभाग अध्यक्ष गणेश भोईर हेही उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post