Vasai-virar वसई-विरार महानगरपालिका राबविणार सखोल स्वच्छता मोहीम

मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे महानगरपालिकेचे आवाहन

वसई:  स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सखोल स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Campaign) वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि.२० जानेवारी २०२४ पासून राबविण्यात येत आहे. शहरातील हवा स्वच्छ राहून प्रदूषण कमी राहण्यासाठी धुलीकण कमी करणे आणि संपूर्ण शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते सखोल पद्धतीने स्वच्छ करून धुवून घेणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. 

 सदर मोहीम महानगरपालिका क्षेत्रात दर शनिवारी सकाळी ०७ ते ११ या वेळेत प्रभाग निहाय टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल व मोहीम अशीच पुढे सुरु राहील. या मोहिमेसाठी महानगरपालिकेमार्फत अधिकारी व कर्मचारी यांची पथके नेमण्यात आली आहेत. तसेच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीकोनातून विचार करून या मोहिमेत महानगरपालिका, इतर शासकीय कार्यालये, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी, सदस्य, पत्रकार, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी व शिक्षक वर्ग, युवा-महिला मंडळे, विविध सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, गणेशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे, औद्योगिक संस्था इ.तसेच सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. 

   या अभियानाची सुरुवात प्रभाग समिती ‘ए’ बोळींज कार्यक्षेत्रापासून होत असून या अभियानात सहभागी होण्यासाठी संबंधितांनी शनिवार, दि.२०/०१/२०२४ रोजी “गोकुळ टाऊनशीप गेट, पोलीस बीट चौकीजवळ, बोळींज, विरार (पश्चिम)” या ठिकाणी सकाळी ०७.०० वाजता उपस्थित राहून आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे.     

                                                                           

Post a Comment

Previous Post Next Post