२४ तासात मानपाडा पोलिसांनी केले गजाआड
डोंबिवली ( शंकर जाधव ) : पत्नीने प्रियकरासह पतीची हत्या करून मृतदेह दगडाला बांधून विहिरीत फेकून दिल्याची घटना कल्याणमधील आडवली येथे घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी महिलेला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.या खून प्रकरणाचा तपास मानपाडा पोलिसांनी चोवीस तासात केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिटा लोवंशी आणि तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे.तर चंद्रप्रकाश सुरेशचंद्र लोवंशी (३२) असे हत्या झालेल्याचे नाव आहे.२५ तारखेला आडिवली येथील नेताजीनगर संकुलातील विहिरीतून अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. धारदार शस्त्राने गळा चिरल्यानंतर कमरेला दोरी व तारेने दगड बांधून मृतदेह पाण्यात फेकून दिला होता.या हत्येप्रकरणी पोलिसांनी मरेकऱ्यांचा शोध घेत होते.मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक होनमाने व पोलीस पथकाने तपास सुरू केला.
पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या हरवलेल्या तक्रारीची माहिती घेतली. चंद्रप्रकाश हा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांना यात संशय आल्याने मृताची पत्नी रीटा हिची चौकशी केली. चौकशी रिटाने आडिवली येथील सुमित विश्वकर्मा याचा उल्लेख केला. यानंतर पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता चंद्रप्रकाश यांच्या हत्येचे गूढ उकलले. रीटा आणि सुमित लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम करतात.प्रेमात पती काटा असल्याने दोघांनी त्याला संपविण्याचे ठरविले. दोघांनी मिळून चंद्रप्रकाश याचा धारदार शस्त्राने खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दगडाला बांधून विहिरीत फेकून दिला.