मनोज जरांगे शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक
अलिबाग / (धनंजय कवठेकर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर आल्यावर मला ऊर्जा मिळते, अशी भावना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केली. मंगळवारी (दि.३०) जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने काढलेल्या अधिसूचनेला ९ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण होणार आहेत. त्यामुळे या अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांनी अनवाणी रायगड किल्ला सर केला. तसेच, रायगडावरील माती त्यांनी आपल्या कपाळी लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी जरांगे थेट आंतरवाली सराटी येथील आपल्या घरी परतणार आहेत. आंतरवाली सराटीमध्येच हे आंदोलन होणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे. आमचे आंदोलन अजूनही संपलेले नाही. सरकारने काढलेल्या अधिसूचनेचा लाभ मराठा समाजाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले.
आज छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला आहे. तसेच, या पवित्र भूमीची माती कपाळी लावली. याप्रसंगी त्यांच्यासोबत काही निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत जो काही अन्याय होत आहे, तो लढा आता शंभर टक्के पूर्ण होणार आहे. ज्याप्रमाणे मराठे स्वराज्यात एकवटले होते, त्याचप्रमाणे आता एकवटले आहेत, असे जरांगेनी स्पष्ट केले. आज शिवरायांचा आशीर्वाद घेऊन लढाई यशस्वी करण्यासाठी निघालो आहे. तर, पवित्र विश्वाची रायगड ही राजधानी आहे. ज्या देशाला स्वराज्य दिलं, त्या दैवताच्या पवित्र भूमीवर आपण पहिल्यांदा तरी पायात चप्पल न घालता गेले पाहिजे यासाठी अनवाणी पायांनी आलो असल्याचे जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबतचा मराठा समाजाचा खूप दिवसांचा लढा आहे. आता मराठा समाजाचे पुरावेदेखील सापडले आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा संयम न पाहता, तात्काळ पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे,अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर मराठा समाजाचा विश्वास आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ जाऊन शपथ घेतल्याने त्यांच्यावर मराठा समाजाला अत्यंत विश्वास आहे.
मुख्यमंत्री मराठ्यांच्या लेकरांना नक्कीच न्याय देतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीदेखील अनेक शब्द पाळले आहेत आणि आताही पाळतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांनी सरकारला आशीर्वाद आणि सद्बुद्धी द्यावी, असेही जरांगे म्हणाले.