भूजल संसाधनाला हवामान बदलाचा सर्वाधिक फटका



नवी दिल्ली: हवामान बदलाचा परिणाम सर्व स्तरावर दिसण्यास सुरुवात झाली आहे. याचा सर्वाधिक फटका वातावरणाबरोबरच भूजल संसाधनांवरही झपाट्याने होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पाणी वापराच्या  चुकीच्या व्यवस्थापनामुळे त्याची पातळी देशभरात सातत्याने घसरत असताना दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या बाबतीत सर्वात मोठे हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहेत. ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ORF) च्या  अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

 २०२२-२३ या वर्षाच्या हा अभ्यास अहवालात देशभरात ७० ते ८० टक्के भूजलाचा वापर शेतीसाठी केला जातो. तर पंजाब आणि हरियाणामध्ये हे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे. १० टक्के भूजल घरगुती वापरासाठी (पिण्याचे पाणी, स्वयंपाक आणि धुणे) होत आहे. दिल्लीतील भूजलाचा वापर ग्रामीण भागात बांधकाम, औद्योगिक आणि सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  या अभ्यासानुसार, दिल्लीत प्रमाण, गुणवत्ता, व्याप्ती, वापर आणि विल्हेवाट या पाणीपुरवठ्याशी संबंधित पाच प्रमुख समस्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीतील लोकांना सुरक्षित आणि शुद्ध पाण्याचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सहयोगी प्रयत्न आणि शाश्वत उपाय आवश्यक आहेत. 
अभ्यासात असे आढळून आले आहे की मूव्हिंग बेड बायोफिल्म रिॲक्टर सिस्टम दिल्लीच्या परिस्थितीसाठी सर्वात योग्य आहे. जेथे शक्य असेल तेथे ते नवीन ट्रीटमेंट प्लांटमध्ये वापरावे. दुसरीकडे, दिल्ली जल बोर्ड (DJB) राष्ट्रीय राजधानीतील काही तलाव आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहे. 

याव्यतिरिक्त, भूजल स्त्रोताचे प्रदूषण आणि बाह्य नुकसानीपासून संरक्षण करणे हे गरजेचे असून सिंचनामध्ये त्याचा जास्त वापर केल्यामुळे त्याची पातळी कमी झाल्यामुळे जलसंधारणाच्या कडक घोरणाची अंमलबजावणी करणे हे अत्यंत महत्वाचे असल्याचे म्हटले गेले आहे. आगामी काळातील भूजल व्यवस्थापनाची समस्या योग्य प्रकारे समजून घेणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे हे अत्यंत आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
जगभरात भूजलाचा जितका वापर होतो, त्यातील २५ टक्के वापर एकट्या भारतात होतो. याबाबतीत चीन आणि अमेरिका यांना भारताने मागे सोडले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post