पीएनपी चषकाचे भव्यदिव्य आयोजन
अलिबाग: (धनंजय कवठेकर): महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून संघर्षशील नेतृत्वांचा उदय झाला त्याप्रमाणेच आपल्या रायगड जिल्ह्यात सुद्धा भाऊ म्हणून परिचित असलेले प्रभाकर नारायण पाटील नावाचे एक झंझावात उदयास आले. लहानपणापासूनच संघर्षाचे प्रखर अस्त्र मिळालेले प्रभाकर पाटील हे आपल्या कार्याने रायगडचेच नाही तर कोकणचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाऊ लागले. कष्टकरी ,शेतकरी तसेच जनसामान्यांचा आधारवड असलेले, गोरगरिबांचे कैवारी, हाडाचे पत्रकार असणारे प्रभाकर पाटील सामाजिक ,सांस्कृतिक क्रांतीचे जनक मानले जाऊ लागले. प्रशासनावर पकड असलेले भाऊंनी रायगड जिल्ह्यात शिक्षण, आरोग्यावर विशेष भर दिला. कबड्डी, क्रिकेट तसेच अनेक मैदानी खेळांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या या खेळा वरील प्रेमाला आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी पीएनपी चषकाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट खेळाला मिळालेली व्याप्ती आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी त्यांना दर्जेदार आणि व्यावसायिक व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) मिळण्याच्या दृष्टीकोनातून रायगड जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धा
विशेषतः ग्रामीण भागातील या सर्व खेळाडूंना एकत्रित करून त्यांच्याकरीता ही स्पर्धा आयोजित करणे अत्यावश्यक आहे या दृष्टीकोनातूनच भारतीय शेतकरी कामगार पक्ष, पीएनपी ग्रुप, जिल्हा महिला आघाडी तसेच पुरोगामी युवक संघटना, चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग, रोहा, मुरूड या तीन तालुक्यांसाठी टेनिस क्रिकेटपटूंसाठी दर्जेदार आणि व्यावसायिक टेनिस क्रिकेट स्पर्धा दिनांक १७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील आझाद मैदानामध्ये भाऊंच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी पीएनपी चषक या नावाने आयोजित केली जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये वर उल्लेख केलेल्या तिनही तालुक्यातील २४ संघ खेळणार असून त्यामध्ये तब्बल ३३६ खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेकरीता चार संघांचा एक गट निश्चित केला जाणार असून एकूण ६ गटांमधून ६ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. विशेष म्हणजे पाच दिवस आयोजित केलेली ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवरती दिवस-रात्र प्रकारामध्ये खेळविली जाईल. विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेटपटूंना खेळण्याचा अनुभव मिळावा आणि त्यातून भविष्यातील भारतीय संघात या खेळाडूंचे स्थान निश्चित व्हावे अथवा त्यांना संधी मिळावी हा प्रामाणिक दृष्टीकोन ठेवून ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धांकरीता अलिबाग तालुक्यातील सात, मुरूड तालुक्यातील दोन आणि रोहा तालुक्यातील एक अशा 10 जिल्हा परिषद मतदारसंघातून आणि अलिबाग आणि मुरूड शहरामधून सर्व एकत्रित खेळाडूंची लिलाव (ऑक्शन) पद्धतीने निवड केली जाणार आहे. प्रत्येक संघांमध्ये १४ खेळाडूंचा समावेश असणार असून या स्पर्धेची पारितोषिके आजवर जिल्ह्यात आयोजित केलेल्या स्पर्धांपेक्षा सर्वाधिक रकमेची आणि आकर्षक स्वरूपाची असणार आहे.
स्पर्धेमधून तीन संघांना पारितोषिके देऊन गौरविले जाणार असून त्यांच्यासमवेत संघमालक, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्तम यष्टिरक्षक, सर्वोत्तम ४० + खेळाडू अशा विविध प्रकारांमध्ये वैयक्तिक आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धेतील खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेकरीता ऑनलाईन लिंक तयार करण्यात आलेली असून खेळाडूंना रजिस्ट्रेशनची अंतिम मुदत ही ३१ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे. तसेच या प्रक्रियेमध्ये तालुक्यामधून तब्बल १००० पेक्षा अधिक खेळाडूंचे रजिस्ट्रेशन केले जाणार असून दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ऑक्शन सोहळा आपल्याला अलिबागमध्ये अनुभवायला मिळणार आहे. याकरिता मुंबईस्थित अल्टिमेंट इव्हेंट मेकर ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी याची संपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहे.
या स्पर्धेमध्ये तीनही तालुक्यातील टेनिस क्रिकेटसाठी तसेच लेदर क्रिकेटसाठी ज्यांनी भरपूरयोगदान दिले आहे अशा खेळाडूंना गौरवित करण्यात येणार असून स्पर्धेच्या पाचही दिवस विशेष सांस्कृतिक आणिखेळाशी निगडीत असणारे अनेक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नामांकित पंच राज्यातील नामवंत समालोचकांसमवेत स्थानिक समालोचक या स्पर्धेत पहायला मिळणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील हे उपस्थित राहणार असून यांच्यासमवेत राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आ. पंडित पाटील, आ. बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उद्योजक नृपाल पाटील तसेच शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचे या मतदारसंघातील आजी-माजी सरपंच, सदस्य तसेच इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील भव्य दिव्य गॅलरी उभारण्यात येणार असून स्पर्धा अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीकोनातून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून घराघरात करण्यात येणार आहे. तसेच मैदानामध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार असून मैदानाच्या बाहेर असणाऱ्या प्रेक्षकांना देखील या सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. महिला व शालेय विद्यार्थ्यांकरीता विशेष राखीव गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.