ठाकरे गटाचे शहर संघटक रोहिदास मुंडे यांचा घणाघात
दिवा, (आरती मुळीक परब) : दिव्यात अजून ही काही भागात पाणीटंचाई असताना बेडेकर इंग्लिश स्कूल येथे पाण्याची लाईन फुटून वाया जाणाऱ्या लाखो लिटर पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप ठाकरे गटाचे शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
दिवा शहरात रिमॉडलिंग नागरिकांना योग्य पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने झाले की ......? २२१ करोड रुपये खर्चून रिमॉडलिंग म्हणजेच पाण्याचे नवीन पाइपलाईन्स घाईघाईने (अनियोजीत पद्धतीने) टाकण्यात आल्या ? कारण त्या कामाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करायचे होते...! ठरल्या प्रमाणे शिंदेंच्या हस्ते त्या कामाचे उदघाटनही करण्यात आले, जवळ जवळ ४२ ते ४४ MLD पाणी दिवेकरांसाठी असतानाही मग आजही दिवा शहरातील अर्ध्या अधिक भागात पाणीपुरवठा सुरळीत का नाही ? म्हणजेच पालिकेचा नियोजन शून्य मनमानी कारभारच सुरू आहे.
उद्घाटनाच्या एक दिवसा अगोदर करण्यात आलेल्या नवीन पाइपलाईनच्या टेस्टिंग दरम्यान या पाण्याच्या लाईन्स दिवा- आगासन रोडवरील विकास म्हात्रे गेट समोर मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याचे सोशल मीडियावर वायरल झाले व नेटकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना, पालिका अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. तेव्हा रातोरात नवीन बनवलेल्या रस्त्याची तोडफोड करत युद्धपातळीवर पाइपलाईन दुरुस्त करून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
पुन्हा एकदा दिवा शहरात आगासन गेट जवळ पुन्हा प्रयत्न फसला आणि आगासन रेल्वे फाटक जवळ पुन्हा एकदा पाण्याच्या लाईनी फुटल्या आणि काँक्रेट रस्त्याच्या आतून डिव्हायडर मधून पाणी बाहेर येऊ लागले म्हणजे यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी ही झालीच पाहिजे. टक्केवारीच्या नादात दिव्याचा विकास होत नाही, सत्ताधारी विकासाच्या नावाने बोंबा मारत असले, तरी यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला हे आम्ही वारंवार निदर्शनास महापालिकेच्या आणून दिलेले आहे. परंतु ठाणे महापालिकेने दिव्यात होणाऱ्या विकास कामाबद्दल डोळ्यावरती पट्टी बांधलेली असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. आज बेडेकर नगर येथे बेडेकर इंग्लिश स्कूलचे येथे लाखो लिटर पाणी लिकेज होऊन रस्त्यावरती पाणी साचलेले असले तरीही महापालिकेच्या पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे नागरिक पाण्यापासून वंचित असताना लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरी याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.