बदलापूर : बदलापूरकरांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नव्या पुलाच्या कामासाठी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासाने घेतला आहे. या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी नवा पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामात ६ एक्सलेटर आणि ३ लिफ्टचा समावेश असणार आहे, यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
या ठिकाणी मुंबई तर कर्जत दिशेने १२ मिटरचा बंदिस्त पुल बांधण्यात येणार आहे. हा पूल आधुनिक असणार आहे.
या पूलाच्या पिलर उभारणीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरील जागा ही कमी पडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एक नंबर फ्लॅटफॉर्म क्रमांक हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी येथे लोखंडी कुंपण देखील घालण्यात येणार आहे. हा फ्लॅटफॉर्म बंद झाल्याने प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी होम प्लॅटफॉर्मवरुन जाणारी लोकल पकडावी लागणार आहे.
या ठिकाणी तिकीट घर, रेल्वे स्टेशन मास्तरचे कार्यालय, शौचालय, खानपाणाचे स्टॉल, प्रतीक्षागृह आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी सरकता जिना देखील बांधण्यात येणार आहे. हा पूल बांधण्यासाठी मोठे पिलर उभारण्यात येत असून हे पिलर एक व दोन नंबरच्या फलाटावर उभारण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी जागा कमी असल्याने फक्त कर्जतकडे जाणाऱ्या लोकलसाठी दोन नंबरचा फलाट सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्याचा एक नंबरचा फलाट कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.
पूर्वी या दोन्ही प्लॅटफॉर्मवरुन लोकल पकडण्याची सोय असल्याने प्रवाशांची गर्दी ही विभागली जात होती. मात्र, आता क्रमांक १ चा प्लॅटफॉर्म बंद करण्यात आल्याने आत होम प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. यामुळे लोकल पकडतांना प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे बदलापूरकर येथील प्रवासी संतप्त झाले आहेत.