भारतीय सैन्यातील मराठा रेजिमेंटच्या ७ व्या बटालियनचा “६१ वर्धापन दिन” उत्साहात संपन्न


दिवा, (आरती मुळीक परब) :  भारतीय सैन्यातील शूरवीर मराठा रेजिमेंटच्या ७ व्या बटालियनचा “६१ वर्धापन दिन” डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात हजारोंच्या संख्येने सेवानिवृत्त माजी सैनिकांनी एकत्र येवून साजरा केला. माजी सैनिकांनी सर्व माजी सैनिकांसाठी प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आणि संपूर्ण दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमात भारतमातेची सेवा करतांना शहिद झालेल्या आपल्या सहकाऱ्यांप्रती अमर जवान स्मृतीस्थंभ उभारून सामूहिक मानवंदना व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी बटालियनचे कमान अधिकारी माजी ब्रिगेडियर सुमंत दशरथ, माजी कर्नल भगतसिंग देशमुख, सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव व बहाद्दूर जेसीओ आणि जवान उपस्थितीत होते. त्यानंतर सभागृहात राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

 सैनिकांसाठी नवीन योजना स्पर्श डिफेन्स पेंशन (SPARSH defpen) बद्धल सखोल माहिती देण्यात आली. त्यानंतर मराठा बटालियनने ज्यांचे युद्धकौशल्य आत्मसात केले, असे सर्वांना आदर्श असणारे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर माजी सैनिकांचे सुपुत्र ह.भ.प शिवव्याख्याते उत्तम महाराज जाधव यांनी “शिवराय घराघरात, शिवराय मनामनात” या धगधगत्या विषयांवर आपले ज्वलंत व परखड विचार प्रकट केले. नंतर बटालियांच्या गौरवशाली इतिहासाचे कथन करतांना एका एका प्रसंगावर बोलताना व ते वर्णन करताना युद्धातील तो प्रसंग ज्यात आपले सहकारी शाहिद झाले, डोळ्यादेखत कसे मृत्यमुखी पडत होते, काहीजण कसे बर्फात गाढले गेले आणि तो प्रसंग ऐकतांना त्याच वीर जवानाची धर्मपत्नी कल्पना देविदास पाटील व त्यांचे चिरंजीव सभागृहात उपस्थितीत होते. 

अगदी अंगावर काटे उभे करणारा आणि युद्धातील चित्तथरारक प्रसंग ऐकतांना सभागृहातील वातावरण अतिशय गंभीर आणि काहीस भावनिक झाले होते. बटालियनच्या उच्चतम कामगिरीमुळे सेनाध्यक्ष यूनिट प्रशंशापत्र, यूनिट अप्रेशियेशन, कीर्ती चक्र, शौर्य चक्र, युध्द सेवा पदक, विशेष सेवा पदक अनेक सेना मेडल, कमेंडेशन कार्ड, मेंशन इन डिस्पॅचेस असे अनेक अवॉर्ड्स मिळाले आणि बटालियनचा गौरवशाली इतिहास घडवला या सर्वश्रेष्ठ कामगिरीमुळे बटालियनला विदेश जाण्याचा म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांती सेनेत (UN mission) जाण्याचा गौरव प्राप्त झाला. त्याच प्रमाणे सर्विसमध्ये असतांना विविध प्रकारच्या लढाईमध्ये आणि आतंकवाद्यांच्या हल्ल्या मध्ये जखमी जवानांना व शहिद वीरनारींना सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित सैन्य अधिकाऱ्यांकडून सभागृहाला संबोधित करण्यात आले. त्यात माजी सैनिक सेवानिवृत्ती नंतर समाजामध्ये मुख्यप्रवाहाच्या एकदम बाहेर राहतो, त्यांना वर्षातून एकदातरी एवढी वर्ष सोबत काम केलेले आपल्या सहकाऱ्यांना एक दुसऱ्यांना भेटता यावे ही संकल्पना ठेवली असे बटालियनचे नेतृत्व केलेले माजी कर्नल देशमुख आणि ब्रिगेडियर दशरथ यांनी बटालियनच्या विशेष उपलब्धीवर प्रकाश टाकला. 

समाजामध्ये आपले स्थान हे विश्वास आणि प्रामाणिकपणा मुळे आहे ते स्थान कायम असावे यावर भर दिला. भविष्यातही अशा प्रकारचे आयोजन होत राहो यामध्ये अधिकाधिक जवानांचा सहभाग असावा आणि एकजूट राहावी, असे विचार प्रकट केले. स्पर्श डिफेन्स पेंशन (SPARSH defpen) बद्दल सुभेदार केशव लहाने व हवालदार अशोक फडतरे यांनी माहिती दिली, कॅप्टन भानुदास सिरसाट, सेना मेडल आणि कॅप्टन संतोष धुरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंकलन केले शेवटी सुभेदार सुभाष दरेकर यांनी आभार प्रदर्शन करतांना उपस्थितांचे धन्यवाद व्यक्त केले व देशासाठी शहिद झालेल्या जवानांप्रती संवेदना प्रकट करुन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मराठा स्पूर्ती गीत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि भारत माता की जय या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सैनिकांचा पारंपरिक बडाखाना म्हणजे सामूहिक भोजनाचा कार्यक्रम पार पडला.

 


Post a Comment

Previous Post Next Post