केरमन: इराणचे जनरल कासीम सुलेमानी यांचा २०२० साली अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दोन बॉम्बस्फोट झाले, यामध्ये सुमारे ९५ जण ठार झाल्याची माहिती इराणच्या प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.
केरमन शहरातील साहेब अल-जमान मशिदीजवळ मिरवणुकीत झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी या “दहशतवादी हल्ल्याला” “कठोर प्रत्युत्तर” दिले जाईल अशी शपथ घेतली आहे. ४२ वर्षांतील सर्वात मोठा प्राणघातक हल्ला मानला जात आहे. मृतांची संख्या सुरुवातीला १०३ इतकी नोंदवली गेली होती, परंतु इराणच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की काही नावे चुकून दोनदा नोंदवली गेली. इराणच्या आपत्कालीन सेवा यंत्रणेचे प्रवक्ते बाबक येक्तपरस्त यांनी माहिती देताना सांगितले की, याठिकाणी ७३ हून अधिक लोक मृत्यूमुखी पडल्याची आमची माहिती आहे. तर १७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बाबक यांच्या प्रतिक्रियेनंतर सरकारी वृत्तवाहिनीने १०० हून अधिक नागरिक मारले गेले असल्याचे सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.
अरब फुटीरतावादी आणि इस्लामिक स्टेट (IS) सारख्या सुन्नी जिहादी गटांवर संशय व्यक्त केला जात आहे. सुलेमानी हे इराणमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून पाहिले जात होते.
इराण-समर्थित पॅलेस्टिनी गट, हमासचा उपनेता लेबनॉनमध्ये इस्त्रायली ड्रोन हल्ल्यात मारला गेल्यानंतर प्रदेशात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असल्याचे म्हटले जात आहे.