पुनर्विकासासाठी नऊ कोटी १३ लाख रुपयांची विशेष तरतूद
धुळे : 'अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत भारतीय रेल्वेची देशभरातील एक हजार ३०९ स्थानकांची पुनर्विकासासाठी निवड करण्यात आली आहे. यात भुसावळ विभागातील १५, तर मध्य रेल्वेच्या ७६ स्थानकांचा समावेश आहे. याच माध्यमातून धुळे स्थानकाचा कायापालट करण्यात येत आहे. धुळे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी नऊ कोटी १३ लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण होण्याची अर्थात २०२४ मध्ये काम पूर्ण केले जाईल, असेही खासदार डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. या पुनर्विकासाच्या कामामध्ये संपूर्ण धुळे शहराचा चेहरा बदलला जाणार आहे.
स्थानकाचे परिभ्रमण क्षेत्र सध्या बांधले जात आहे, ज्याचा उद्देश प्रवाशांची सुलभता आणि सुविधा सुधारणे आहे. स्टेशनच्या सीमेवरील भिंतीच्या वीटकामाचे काम प्रगतीपथावर आहे, ज्यामुळे सुरक्षा आणि सौंदर्य वाढेल.
स्टेशनच्या प्रवेशद्वाराची सुधारणा करण्यासाठी स्टील कटिंग आणि कॉलम बाइंडिंगचे काम सुरू आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंग क्षेत्राचे सपाटीकरण करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना गाड्या पार्क करणे सोयीस्कर होणार आहे.
मध्य रेल्वे (CR) रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अमृत स्थानक मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरपणे पालन करण्यात येत आहे. धुळे स्थानकाचा पुनर्विकास हा या प्रयत्नातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले जात आहे.