मंगळवार ते गुरुवार असा तीन दिवस चालणार ३६९ वा उरूस
आग्रा : सम्राट शहाजहानचा ३६९ वा उरूस मंगळवार ते गुरुवारदरम्यान ताजमहाल येथे होणार आहे. मंगळवारी तहखाना येथील शहाजहान आणि मुमताज यांच्या समाधी गुस्लच्या विधीने पर्यटकांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. उरूसच्या वेळीच या कबरी उघडल्या जातात.
गुरुवारी अर्पण करण्यात येणारी १५६० मीटर लांबीची रंगीबेरंगी हिंदुस्थानी चादर या उरूसचे सर्वात महत्वाचे आकर्षण असणार आहे. उरूसच्या पहिल्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजता गुस्ल सोहळा होणार आहे. प्रार्थनेचे पठण केले जाईल. बुधवारी दुपारी दोन वाजता चंदन अर्पण करण्यात येणार आहे. मंगळवार आणि बुधवारी दुपारी दोन वाजल्यापासून पर्यटकांना स्मारकात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटकांना गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ताजमहालमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.
गुरूवारी दिवसभर कव्वाली होणार असून सायंकाळी लंगरचे वाटप होणार आहे. हिंदू महासभेने शहाजहानच्या उरूसच्या आयोजनावर आक्षेप घेत सोमवारी सहाय्यक अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ नीरज वर्मा यांना निवेदन दिले. हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय जाट यांनी सांगितले की, महासभेने उरूसवर बंदी घालण्यासाठी अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उरूस समितीला नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू असून सार्वजनिक ठिकाणी चारपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी आहे.