मध्य प्रदेशात फटाका कारखान्याला आग

  • १२ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
  • राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख
  • पंतप्रधानांकडून प्रत्येकी २ लाख, जखमींना ५० हजार रुपये

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील मगरधा रोडलगतच्या फटाका कारखान्याला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की कारखान्याच्या आजूबाजूच्या अनेक घरांना देखील आग लागली. आगीत होरपळून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक लोक जखमीही झाले असल्याचे समोर अला आहे. अपघातानंतर राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. पीएम मोदींनीही हरदा घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. सुमारे ४० किमीपर्यंत स्फोटांचा आवाज ऐकू येत होता. स्फोटानंतर कारखाना उद्ध्वस्त झाला. आगीमुळे आजूबाजूच्या घरांमध्ये तीव्र उकाडा जाणवत होता. अनेक घरेही आगीच्या प्रभावाखाली आली. सुमारे तासभर कारखान्यातून स्फोटांचे आवाज येत होते. ही घटना घडली त्यावेळी कारखान्यात सुमारे ५०० लोक काम करत होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बचावकार्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येत आहे.  आगीच्या झळा आणि स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की  कोर्टात सुनावणी करणाऱ्या मॅजिस्ट्रेटलाही कोर्टातून बाहेर काढण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे लोक भयभीत झाले असून मोठा बाजार ते नारायण टॉकीज चौकापर्यंतचा संपूर्ण बाजार बंद करण्यात आला. अनेक घरे रिकामी करण्यात आली आहेत.  प्रशासनाकडून याठिकाणी अनेकवेळा तपास करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. 


Post a Comment

Previous Post Next Post