नवी मुंबई: सेंट झेवियर्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नेरूळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत पंचमी विद्येची देवता सरस्वतीचा प्रकट दिन, ‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे’ औचित्य साधून कॉलेजच्या सीईओ तथा प्राचार्य मनीषा आंधणसरे यांच्या संकल्पनेतून शनिवार, दिनांक १८-०२-२०२४ रोजी सायंकाळी ‘कवी संमेलन’ आयोजित करण्यात आले.
अ.भा.म.सा. परिषदेचे संस्थापक नंदकिशोर जोशी, माझी महापौर सागर नाईक, डॉ. श्याम मोरे, वरिष्ठ पत्रकार मनोज जालनावाला, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, माजी नगरसेवक शिल्पा कांबळे, असे मान्यवर या संमेलनास उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ तसेच नवोदित मान्यवर कवी या संमेलनात सहभागी झाले. मराठी भाषेची महती आणि आयुष्याच्या विविध टप्प्यांवर मार्मिक भाष्य करणाऱ्या विषयांवर कवितांचे वाचन झाले. माझी महापौरांनी आपल्या भाषणातून प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेच्या वापराचा आग्रह झाला तसेच अशा प्रकारची कवी संमेलने आयोजित करण्याचे आश्वासनही दिले.
संस्थापक नंदकिशोर जोशी आणि पत्रकार मनोज जालनावाला यांनी प्रकर्षाने मराठी भाषेचे महत्त्व मांडले. प्राचार्य मनीषा आंधणसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवा पिढीने अंगिकारण्याची गरज व महिलांचे सक्षमीकरण यावर आपले विचार मांडले. उपस्थित रसिक पाहुण्यांनी या काव्यसंध्येचा आस्वाद घेतला. गायक अनिल दामूर्डे यांच्या भावगीत आणि गझल सादर केली. एकूणच मराठी भाषेविषयी जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न या कवी संमेलनाच्या माध्यमातून साध्य झाला.