दिवा, (आरती मुळीक परब) : दिवा मुंब्रा देवी कॉलनी येथे फेरीवाल्यांवर कारवाई दरम्यान दिवा सहाय्यक आयुक्तांसोबत दोन फेरीवाल्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर त्या दोघांवर दिवा पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला.
दिवा स्टेशन परिसर आणि मुंब्रा देवी कॉलनी रोड परिसरात काल संध्याकाळी 6 ते 9 या वेळी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी कारवाई केली. या कारवाई दरम्यान दोन फेरीवाले आणि आयुक्तांमध्ये बाचाबाची झाली. त्यांच्यावर दिवा पोलीस चौकीत रितसर अतिक्रमण विभाग कर्मचारी सुहास रोकडे यांच्याकडून तक्रार नोंदवली गेली आहे. या कारवाई नंतर जे फेरीवाले गाड्या लावतील त्यांच्या गाड्या जप्त करुन तेथेच तोडल्या जातील. अशी दंडात्मक कारवाई सर्व फेरीवाल्या गाड्यांवर केली जाईल, असे काल आयुक्तांनी स्पष्ट केले. काल पासून पूर्ण दिव्यात कारवाईला जोमाने सुरुवात झालेली आहे.
याआधी ही ठाण्यातील माजिवडा येथे फेरीवाल्यांवरील कारवाई दरम्यान कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता, तर दिवा प्रभाग समितीतील सहाय्यक आयुक्त अलका खैर आणि पालिका कर्मचारी प्रवीण शिंदे यांच्यावरही हल्ला झाला होता. फेरीवाल्यांची मजोरी दिवसेंदिवस वाढतच असताना कारवाई दरम्यान बऱ्याच फेरीवाल्यांनी पालिकेला मज्जाव केला.
संध्याकाळी दिवा स्टेशन परिसर आणि मुंब्रा देवी कॉलनी येथे फेरीवाल्यांना मूळे गर्दी होऊन वाहतूककोंडी होत असल्याच्या नागरिकांकडून आलेल्या तक्रारींमुळे संध्याकाळी गर्दीच्या वेळी ही कारवाई घेण्यात आली. नागरिकांना स्टेशन परिसर आणि मुंब्रा देवी कॉलनी परिसरात चालायला ही जागा नसते. प्रत्येक फेरीवाला जास्तीत जास्त सामान लावून रस्ता अडवत असतो. ते हटवण्यासाठी कालची कारवाई आयुक्त गुडधे यांनी केली होती.
रोहिदास मुंडे, शहर संघटक दिवा, उबाठा - दिव्यातील फेरीवाले हटवा म्हणून आम्ही उबाठा कडून वारंवार मागणी केलीली आहे. परंतु दिव्यातील फेरीवाले व आठवडे बाजार हटवले जात नाहीत त्याच अनुषंगाने काल सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांनी दिव्यातील फेरीवाल्यां वरती कारवाई करताना सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. या संदर्भात दिवा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरी या अनुषंगाने फेरीवाल्यांवरती व आठवडा बाजारावर कडक कारवाई करण्यात यावी व दिवा फेरीवालामुक्त करण्यात यावा अन्यथा सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांच्या विरोधात ठाणे मुख्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल.