दिवा प्रभाग समिती क्षेत्रात रस्ते, पदपथ, नाले यांची सफाई
दिवा, (आरती मुळीक परब ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेअंतर्गत दिवा प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली. मुख्य रस्ते, पदपथ, अंतर्गत रस्ते, नाले यांची सफाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेत रस्ते साफ करणे, पाण्याने धुणे, पदपथ सफाई, रस्ते दुभाजक स्वच्छ करणे, नाले सफाई यांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवारी दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानास स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या मोहिमेत सफाई कर्मचा-यांसोबत माजी नगरसेवक शैलेश पाटील, दर्शना म्हात्रे, विशेष युवा अधिकारी साक्षी मढवी, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे, तुषार पवार, मनीष जोशी, उपनगर अभियंता विकास ढोले, उपनगर अभियंता कार्यशाळा गुणवंत झांबरे, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
सकाळी ६.१५ वाजता दिवा सर्कल, आगासन रस्ता, दिवा- शीळ रस्ता आदी परिसरात साफ सफाईला सुरूवात करण्यात आली. मुख्य रस्ते, पदपथ झाडून पाण्याने स्वच्छ करण्यात आले. रस्त्यावरील दुभाजक स्क्रबरच्या सहाय्याने घासून नंतर पाण्याच्या फवारणीने स्वच्छ धुण्यात आले. परिसरातील रस्त्यांंबरोबरच लहान- मोठे नालेही स्वच्छ करण्यात येत आहेत.
या स्वच्छता मोहिमेत, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दातीवली तलावाच्या कामाची पाहणी केली. त्या परिसरात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या सूचना अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी दिल्या.