कर्जत: कर्जत-खोपोली येथील चौक रेल्वे स्थानकावर डिझेल वाहून नेणारी मालगाडी उभी होती. त्याच दरम्यान तेथील कचऱ्याला आग लागल्याने ती आग मालगाडीच्या डब्यांपर्यंत पोहोचली. त्याच दरम्यान डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या बोगीला गळती लागली होती त्यामुळेच त्या बोगीने काही क्षणातच पेट घेतला.
या घटनेची माहिती मिळताच कर्जत , खोपोली आणि खालापूर एमआयडीसीमधील अग्निशामक दलाचे जवान वाहनासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणून मालगाडी कर्जतकडे रवाना करण्यात आली. वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.
मंगळवारी दुपारी ११ वाजून ४६ च्या सुमारास चौक रेल्वे स्थानकात डिझेल वाहतूक करणारी मालगाडी थांबली होती. ही पुण्याकडे जाणार होती. या मालगाडीच्या डिझेल भरलेल्या बोगीला गळती लागली होती. त्याच सुमारास तेथे कचऱ्याला आग लागली होती. ती आग गळती लागलेल्या डिझेलला लागली. या घटनेची माहिती मिळताच चौक पोलीस ठाण्यातील पोलीस व कर्मचारी तातडीने घटना स्थळी आले आणि त्यांनी अग्निशामक दलांशी संपर्क साधला.
थोड्याच वेळात कर्जत अग्निशामक दल, खोपोली अग्निशामक दल, खालापूर एमआयडीसीचे अग्निशामक दलाचे जवान आपल्या अग्निशामक वाहनांसह घटनास्थळी आले. त्याचबरोबर रिलायन्स कंपनीच्या अग्निशामक दलाचे जवान व टाटा स्टील कंपनीच्या अग्निशामक दलाचे जवान पाण्याचे टँकर घेऊन घटनास्थळी आले. त्यांनी आग विझविण्यासाठी सुरुवात केली व दीडच्या सुमारास आग आटोक्यात येऊन ही मालगाडी कर्जतकडे रवाना करण्यात आली.