जागतिक कीर्तीचे ग्रामी अवॉर्ड विजेते संगीतकार पद्मभूषण पं विश्वमोहन भट यांचा अलिबागमध्ये कार्यक्रम
अलिबाग ( धनंजय कवठेकर): मैफिल,अलिबाग या संस्थेचा वार्षिक संगीत महोत्सव दि. 10 व 11 फेब्रुवारी रोजी अलिबाग येथील आर सी एफ च्या कुरूळ वसाहतीत संपन्न होत आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात ग्रॅमी अवॉर्ड विजेते जागतिक कीर्तीचे संगीतकार पद्मभूषण पं विश्वमोहन भट यांचा सहभाग असणार असून ते पं सलिल भट यांच्या सोबत मोहन वीणा जुगलबंदी सादर करणार आहेत.
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्सच्या सहयोगाने गेली पस्तीस वर्षे सातत्याने मैफिल अलिबाग संगीत महोत्सवाचे आयोजन करीत आहे. गेल्या काही वर्षात या संगीत महोत्सवाच्या निमित्ताने, उस्ताद झाकीर हुसेन, पं. उल्हास कशाळकर, पं.रोणू मझुमदार, पद्मश्री पं. विजय घाटे, राकेश चौरासिया, अश्विनी भिडे, आरती अंकलीकर, पं. भवानी शंकर यासारख्या दिग्गज कलाकारांसह अनेक नवोदित कलाकारांच्या सादरीकरणाने अलिबाग परिसरातील संगीत रसिकांना अभिजात संगीताची पर्वणी लाभली होती. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त कलाकारांचा सहभाग असलेल्या ह्या कार्यक्रमांना अलिबागच्या संगीत रसिकांचा उदंड उपस्थितीचा प्रतिसाद तर लाभत आहेच परंतू रेवदंडा, मुरुड, नागोठणे, रोहा, पाली, चोंढी झिराड या ठिकाणांहूनदेखील संगीत रसिक मोठ्या प्रमाणावर महोत्सवाला हजेरी लावत असल्याचे चित्र दिसत आहे.
या वर्षीच्या महोत्सवाचा शुभारंभ शनिवार दिनांक 10 रोजी भुवनेश कोमकली, भाग्येश मराठे आणि ओंकार दादरकर यांच्या स्वर संस्कार कार्यक्रमाने होत आहे. भारतीय संगीतातील दिग्गज कलाकार पं कुमार गंधर्व, पं राम मराठे आणि विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने संस्कार भारतीच्या संकल्पनेतून स्वर संस्कार कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. यात वरील तिन्ही दिग्गज कलाकारांचे नातू आपल्या आजोबांच्या गायकीचे संस्कार दाखविणारा हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या तिनंही कलाकारांना तबल्यावर साथ करणार आहेत प्रसिद्ध तबलावादक यती भागवत तर हार्मोनियमवर आहेत अनंत जोशी. तर सुसंवादक आहेत ओघवत्या सूत्रसंचलनासाठी ख्याती असलेले विख्यात अभिनेते विघ्नेश जोशी.
महोत्सवाच्या दुसर्या दिवसाची सुरुवात करणार आहेत या पिढीतील दमदार गायक डॉ पुष्कर लेले. त्यांच्या सांगीतिक विचारांवर पं.कुमार गंधर्व यांच्या विचारधारेचा खूप प्रभाव आहे. कुमारजींच्या या विचारधारेचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्यांची गायनशैली आत्मसात केली आहे. या महोत्सवाची सांगता पं. विश्वमोहन भट आणि प सलिल भात यांच्या वीणा वादन जुगल बंदीने होणार आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे वादक ग्रॅमी अवॉर्ड विजेते पद्मभूषण पं. विश्वमोहन भट यांनी स्पॅनिश किंवा स्लाईड गिटार या वाद्यात बदल करून काहीशी सुटसुटीत मोहनवीणा निर्माण केली. ही वीणा गायकी अंगाने वाजवण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो आणि त्यात ते माहीर आहेत.त्यांच्या या कौशल्याला १९९४ मध्ये ग्रॅमी अवॉर्डने सन्मानित केल्यामुळे त्यांच्या वादनाला आंतरराष्ट्रीय दाद मिळाली असं म्हणावं लागेल.पंडितजींचे शिष्य आणि जेष्ठ सुपुत्र पं.सलील भट यांनीही सात्विक वीणा या वाद्याचा अविष्कार करून त्याच्या वादनात आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केली आहे. त्यांना या जुगल बंदित सुविख्यात तबलजी पं रामदास पळसुले यांची तोलाची साथ लाभणार आहे. जागतिक कीर्तीच्या या तीनही कलाकारांची मैफिल संगीत रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरावा.
अशा या राष्ट्रीय-आंतर राष्ट्रीय ख्यातकिर्त कलाकारांच्या सादरीकरणाने नटलेल्या संगीत महोत्सवास संगीत रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संजय मोराणकर 7507904542 किंवा प्रकाश देशमुख 7722093457 यांच्याशी संपर्क साधावा.