राजकोटमध्ये नाबाद २१४ तर विशाखापट्टणम येथे २०९ धावा
राजकोट : भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरे द्विशतक झळकावले आहे. विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये यशस्वीने शानदार बॅटींगला प्रदर्शन करत सलग दुहेरी शतके झळकवली. तिसऱ्या राजकोट कसोटीच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जैस्वालने २३६ चेंडूत१४ चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने नाबाद २१४ धावा केल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांची बँड वाजवत यशस्वीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावातही २०९ धावा केल्या होत्या. हैदराबाद कसोटीत यशस्वीला फारशा धावा करता आल्या नव्हत्या.
जैस्वालने विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या कसोटीत २०९ धावांची शानदार खेळी केली. जैस्वालने हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीतही उत्कृष्ट फलंदाजी करत पहिल्या डावात ८० धावा केल्या. मात्र, दुसऱ्या डावात त्याला केवळ १५ धावा करता आल्या. सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतके करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विराटने २०१७-१८ मध्ये, विनोद कांबळीने १९९२-९३ मध्ये ही कामगिरी केली होती. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल भारतासाठी दुसऱ्या डावात द्विशतक झळकावणारा जगातील सातवा फलंदाज ठरला आहे. या क्लबमध्ये भारताचे दिग्गज खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण, वसीम जाफर, मन्सूर अली पतौडी आणि सुनील गावसकर यांचा समावेश आहे.
सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम
यशस्वी जैस्वालने नवज्योत सिंग सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांचा विक्रम तोडत एका डावात सर्वाधिक १० षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. नवज्योत सिंग सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांच्या नावावर प्रत्येकी ८ षटकार मारण्याचा विक्रम आहे. १९९४ मध्ये लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सिद्धूने ८ षटकार ठोकले होते. यानंतर मयंक अग्रवालने २०१९ मध्ये इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीच्या डावात फलंदाजी करताना ८ षटकार ठोकले. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत जैस्वालची बॅट जोरदार बोलते आहे. जैस्वालने या मालिकेत २० षटकार पूर्ण केले असून, यासह तो कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे.