काही ठिकाणी पावसाची रिमझिम
नवी दिल्ली. सोमवारी रात्री दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात अचानक जोरदार वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. या पावसामुळे दिल्लीत पुन्हा थंडीचे वातावरण पसरले आहे. येत्या एक-दोन दिवसांत सोसाट्याचा वारा, गडगडाट आणि विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.
विशेष म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे रविवारी तापमानात घट होईल त्याचबरोबर पुढील तीन दिवस हवामानात बदल होण्याचा अंदाज हवामान खात्याने
वर्तवला होता. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, त्यानंतर रात्री सुमारे २ ते पहाटे ४ वाजेपर्यंत संपूर्ण शहराचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. पावसामुळे चंदीगड ते फरिदाबादपर्यंतच्या हवामानात बदल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत.
सोमवारी, दिल्लीचे कमाल तापमान २८.२ अंशांवर नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा चार अंशांनी जास्त होते, तर किमान तापमान १४.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे सामान्यपेक्षा तीन अंश जास्त होते. या हंगामातील सर्वोच्च किमान तापमान नोंदविण्यात आले आहे.
मंगळवारीही दिवसभर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, मात्र एक-दोन ठिकाणीच रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता असून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८ आणि १२ अंश असू शकते असेही हवामान खात्याने म्हटले आहे.