विरुधुनगर (तामिळनाडू). तामिळनाडूतील विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ गंभीर जखमींवर शिवकाशी सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील रामू देवनपट्टी येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात कामगार नेहमीप्रमाणे काम करत असताना फटाक्यांच्या रसायनांचा अचानक स्फोट झाला. आधी या स्फोटात ५ महिला कामगार आणि ३ पुरुष कामगारांसह ८ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवकाशी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे.
विरुधुनगर जिल्ह्यात शनिवारी हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासाचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की मृतांमध्ये महिलांचाही समावेश असून स्फोटाचे कारण शोधले जात आहे. ही घटना वेंबकोट्टई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.