सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विकासकामे
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण -डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत डोंबिवली शहरातील २७ रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामासाठी कॅबिनेट मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी ५११ कोटी रुपयांचा विकास निधी दिला. या प्रस्तावित कामांमुळे रस्त्यांची वाहतूक क्षमता वाढणार असून लोकांच्या प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधावरी सदर विकास कामांची माहिती देण्यासाठी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी या विषयी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर भाजपा कल्याण जिल्ह्याध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, माजी नगरसेवक राहुल दामले, विकास म्हात्रे, मंदार हळबे, मुकुंद ( विशू ) पेडणेकर, रेखा चौधरी, शशिकांत कांबळे, नंदू परब, विकी तरे, मोनाली तरे, निलेश म्हात्रे, दया गायकवाड,संदीप पुराणिक, विनोद काळण, खुशबू चौधरी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना असा प्रयत्न होता की, डोंबिवली मतदार संघातील प्रत्येक रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाचा असावा. दरम्यान २७ महत्त्वाचे रस्ते काम करण्याचे ठरले होते. काँक्रीटीकरण माध्यमातून होणारे उपरस्ते मुख्य रस्त्यांशी जोडले जाणार आहेत.
सदर विकास कामांमध्ये डोंबिवली पूर्व-पश्चिम शहरातील मुख्य रस्ते काँक्रीटीकरणसाठी अंदाजे ३७५ कोटी रुपये खर्ची होणार आहेत. तसेच डोंबिवली पूर्व-पश्चिम रेल्वे स्थानक प्रवेशद्वार सुशोभीकरण आणि तेथील सुधारणा या कामासाठी ८ कोटी, शहरातील मूलभूत सोयी-सुविधा यासाठी महाराष्ट्र शासन माध्यमातून ५५ कोटी रुपये खर्ची होणार आहेत. त्याचप्रमाणे पर्यटन विकास म्हणून २० कोटी, भोईरवाडी, चोळेगाव, कोपरगाव, जुनी डोंबिवली येथील गणेश विसर्जन तलावसाठी २० कोटी, गणेशनगर खाडीकिनारा सुशोभीकरणसाठी १३ कोटी, दलित वस्ती सुधार कामांसाठी १५ कोटी असा एकूण ५११ कोटी रुपये खर्ची होणार असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.