नवी दिल्ली : आयपीएल २०२४ सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. आयपीएलच्या १७ व्या सीझनची सुरुवात २२ मार्चपासून होणार आहे. BCCI ने नुकतेच २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बोर्डाने उर्वरित सामन्यांची घोषणा केली नाही. दरम्यान, उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या स्पर्धेचे उर्वरित सामने भारतातच होतील, असे सांगितल्यावर या अटकळांना पूर्णविराम मिळाला.
जय शहा म्हणाले, आयपीएल परदेशात खेळविला जाणार नसल्याचे सांगून सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला विराम दिला. निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत, ज्या १९ एप्रिल ते ४ जून या कालावधीत सात टप्प्यांत होणार आहेत. आता मतदानाच्या तारखा निश्चित झाल्यामुळे, बीसीसीआय आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज श्रेयस अय्यर शनिवारी कोलकात्याला रवाना झाला. सुरुवातीपासूनच आयपीएलमध्ये अय्यरच्या उपलब्धतेबाबत अटकळ होती. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतही तो पाठदुखीशी झुंजताना दिसला होता. त्याचवेळी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही तो चौथ्या आणि पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही. केकेआर २३ मार्च रोजी ईडन गार्डन्सवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होम मॅचने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.