सांयकाळी ५ वाजेपर्यंत उत्साहात मतदान संपन्न
धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील असलेल्या ०२-धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाला आज दि. 20 मे, रोजी सकाळी ७.०० वाजेपासून अंत्यत उत्साहात सुरुवात झाली. ०२-धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५६.६१ टक्के मतदान झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.
०२-धुळे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे- धुळे ग्रामीण-५०.३१ टक्के, धुळे शहर-४६.१६ टक्के, शिंदखेडा-४५.८४ टक्के, मालेगांव मध्य-५७.०२ टक्के, मालेगांव बाहृय-४७.०० टक्के, बागलाण-४७.०१ टक्के याप्रमाणे सरासरी ५६.६१ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
आज सकाळी मतदानास सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगा दिसून आल्या. सांयकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. तर काही मतदान केंद्रांवर सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत मतदान सुरु होते. सहाही विधानसभा मतदारसंघातील १९६९ मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यात पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, उन्हाळयातील वाढते तापमान लक्षात घेऊन प्रथमोपचार पेट्या, आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी ओआरएसचे पाकिटे तसेच आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात उपलब्ध करुन दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, युवा, महिला व नागरिकांनी मोठया उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.
स्वत: जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या सातपुडा सभागृहातून वेबकास्टिंगच्या माध्यमामातून मतदारसंघातील ९८६ मतदान केंद्रासह संपूर्ण मतदान प्रकियेवर बारकाईने लक्ष ठेवून ठेऊन होते.
जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात कुठेही अनूचित प्रकार घडल्याची नोंद नाही.
लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा, याकरीता ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाच्या सुचनांनुसार मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. तर धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी भागात अधिकारी, कर्मचारी यांनी गृहभेटीद्वारे नागरीकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली आहे.
