अलिबाग, (धनंजय कवठेकर) : दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांसमोर यक्षप्रश्न उभा राहतो, तो म्हणजे 'आता पुढे काय?' अनेक पर्याय चाचपडून पाहत असताना अनाहुत सल्ले देणारे गांगरवून टाकण्याची भूमिका इमानेइतबारे पार पाडत असतातच, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आणखी गोंधळ उडतो. म्हणूनच आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी गोंधळून जाऊ नयेत, आपली विद्याशाखा त्यांना अचूक निवडता आली पाहिजे आणि आपले शैक्षणिक-व्यावसायिक भवितव्य सुरक्षित करता आले पाहिजे, या उदात्त हेतूने माजी समाजकल्याण सभापती तथा साई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांनी साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून, खडताळ पूल येथील होरायझन हॉलमध्ये विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केलेले आहे.
एपीजे एक्सलन्स अकॅडमी, पुणेचे संस्थापक, शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. दिलीप देशमुख हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास उपस्थित राहणार असून रविवार दिनांक २ जून रोजी दुपारी २ वाजता हे शिबीर सुरू होणार आहे. या शिबिरामध्ये प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन साई क्रीडा मंडळाने केलेले आहे.
या मार्गदर्शन शिबिराच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगताना दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ म्हणाले की, आपल्या ग्रामीण विद्यार्थी-विद्यार्थिनींना दहावी-बारावीनंतर अचूक विद्याशाखा निवडता यावी आणि त्यांचे शैक्षणिक- व्यावसायिक जीवन उज्ज्वल व्हावे, त्यांचे करियर उत्तम घडावे, या भावनेने या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.