अंदाज चुकल्याने दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू
अलिबाग, (धनंजय कवठेकर) : ओव्हरटेक करण्याच्या नादात अंदाज चुकल्याने झालेल्या भीषण अपघातात आयवा गाडीखाली येऊन दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलिबाग-रोहा मुख्य रस्त्यावरील मल्याण फाटानजीक झाला. मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली हकीकत अशी की, सायंकाळी साडेसातच्या वाजताच्या दरम्यान रोहा बाजूकडून अलिबागकडे पिकअप जात होता. दरम्यान, त्याच्या मागोमाग दुचाकीस्वार मार्गक्रमण करीत होता. त्याचवेळी आयवा गाडी अलिबाकडून रोह्याकडे येत होती. दरम्यान, मल्याण फाटानजीक ही वाहने आली असता पिकअपच्या मागून येणार्या दुचाकीस्वाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याच सुमारास समोरून येणार्या आयवा गाडीची जोरदार धडक दुचाकीस्वारास बसली. त्यामुळे तो गाडीखाली चिरडला. त्याची दुचाकी पिकअप टेम्पोच्या खाली जाऊन तिचाही चक्काचूर झाला. या भीषण अपघातानंतर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. तसेच, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, मृतदेह छिन्नविच्छन्न झाल्याने त्याची ओळख पटली नाही. याबाबत अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.