Water problem: अमरावती जिल्हा पाणीटंचाईने त्रस्त

 



 तलावातील घाण पाण्यावर करतात उदरनिर्वाह 

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मरियमपूर गाव व परिसरातील ग्रामस्थांना या कडाक्याच्या उन्हात पिण्याच्या पाण्याची टंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. येथील नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. स्थानिकांना कच्चा रस्ता आणि उंच डोंगर पार करून पाण्याची तहान भागवावी लागत आहे. येथील स्थानिक पाण्यासाठी भटकंती करत असून जिथे मिळेल तिथून पाण्याची तहान भागवत आहेत. या भागात एकमेव तलाव आहे,  तेथील पाणी दूषित झालेले असताना देखील त्याच्या माध्यमातून ग्रामस्थ आपल्या गरजा पूर्ण करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.   याशिवाय प्रदूषित तलावाच्या काठावर खड्डे खोदून लोक पाण्याचा वापर करत आहेत. 

गावकऱ्यांना पाणी मिळविण्यासाठी मोठी  कसरत करावी लागत आहे. दूषित आणि अस्वच्छ पाण्यामुळे लोक आजारी पडत आहेत. हे घाण पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थाना पायपीट करावी लागत आहे. मरियमपूर येथील गावकरी खड्ड्यातील पाणी संपले की, तलावातील घाण पाण्याचा वापर करताना दिसत आहे. तसेच रात्री १०-११ वाजेपर्यंत पाणी मिळवण्यासाठी पळापळ करण्याची वेळ या ग्रामस्थांंवर आली आहे. त्याचबरोबर यांना पाण्यासाठी टँकर देखील मिळत नसल्यामुळे नाराजी पसरली आहे. 

 महाराष्ट्रातील सुमारे ३,००० धरणांमधील सरासरी पाणीसाठा २२.०६ टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी ८.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या दोन दिवसांत  ०.५८ टक्क्यांनी घट झाली आहे.  राज्यात २,९९७ मोठी, मध्यम आणि लहान धरणे असून, छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ९२० धरणे आहेत. 

पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी साठा १५.६७ टक्के आहे, त्यानंतर नाशिक (२४.०६ टक्के), कोकण (३४.२२ टक्के), नागपूर (३८.१७ टक्के) आणि अमरावती ३८.५६ टक्के आहे.  २९ मे पर्यंत २५ जिल्ह्यांतील ३,०७२ गावे आणि ७,९३१ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

 



Post a Comment

Previous Post Next Post