तीन जण गंभीर जखमी
अलिबाग, (धनंजय कवठेकर) : अलिबाग - रेवस मार्गावर बुधवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास महाअपघाताची नोंद झाली आहे. वायशेत येथील आठवडा बाजाराजवळ पायल हार्डवेअर दुकानासमोर ही भीषण दुर्घटना घडली. यामध्ये एक तरुण निश्चकाळजीपणे, रस्ता ओलांडत असताना रेवस बाजूकडून अलिबागकडे जाणाऱ्या दुचाकीची त्याला जबरदस्त धडक बसली. अगदी त्याचवेळी धडक दिलेल्या दुचाकीने समोरून दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झालेत तर एक दुचाकीस्वार ठार झाला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सागर दिगंबर मानूर (रा. राजमळा, ता.अलिबाग) हा तरुण अचानकपणे रस्ता ओलांडत रस्त्याच्या मधोमध धावत आला. त्याची समोरून समोरून आलेल्या पॅशन-प्रो क्रमांक एम. एच. ०४ इ झेड १००७ हिच्यासह प्रवास करणाऱ्या मिलिंद वसंत सुर्वे (वय ५०), रा. मुलुंड, व शैलेश सुरेश करळकर, रा.नालासोपारा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्याचवेळी या दुचाकीची धडक समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला बसली.
अपघातात अलिबागकडून रेवसकडे जाणारा दुचाकीचालक अक्षय अनिल राणे रा. भादाणे - अलिबाग याचा बळी गेला आहे. हा अपघात पादचारी सागर दिगंबर मानूर याच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे सांगण्यात येतेय. या अपघाताचे cctv फुटेज समोर आले आहेत. त्यानुसार अपघाताची भीषणता दिसून येत आहे. अपघाताची दृश्ये पाहणाऱ्याच्या अंगावर शहरे आणतील अशीच आहेत.
या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते व किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी वेळ न दवडता आपल्या मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत जखमींना अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्राथमिक तपासानुसार आरोपी सागर दिगंबर मानूर याच्यावर अपघातास कारणीभूत ठरण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद गायकवाड हे करीत आहेत.