रायगड (धनंजय कवठेकर): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निकाल ४ जून २०२४ रोजी लागणार असून ३२ रायगड लोकसभा मतदानसंघाची मतमोजणी प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, ता. अलिबाग येथे पार पडणार आहे.
दि.७ मे २०२४ रोजी ३२ रायगड लोकसभा मतदानसंघाची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान यंत्र जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली ता. अलिबाग येथे ठेवण्यात आल्या असून त्यास केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल व रायगड जिल्हा पोलीस दल असा तिहेरी घेरा घालून संरक्षित करण्यात आले.
दिनांक ४ रोजी पार पडणाऱ्या मतमोजणी प्रक्रिये दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आलेला असुन त्याकरीता एकुण ३५ पोलीस अधिकारी, २०९ पोलीस अंमलदार, १ RCP प्लाटून, ०१ SRPF प्लाटून, ०१ CRPF प्लाटून असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
तथा मतमोजणी दरम्यान व निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रसार माध्यमांव्दारे कोणत्याही राजकीय, सामाजिक तथा धार्मिक व्यक्ती अथवा व्यक्तींच्या किंवा समाजाच्या/गटाच्या भावना दुखावणा-या पोस्ट, कमेंट, व्हिडीओ, बॅनर प्रसारीत न करण्याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत सर्व नागरीकांना विनंती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शांतता व सलोखा राखणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.