विजयानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
अलिबाग, (धनंजय कवठेकर) : महायुतीमधील सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक याला इथल्या जनतेने साथ दिली. मी रायगड, रत्नागिरीमधील जनतेचा ऋणी आहे. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार सुनील तटकरे यांनी विजयानंतर बोलताना दिली. सुनील तटकरे यांनी निकालाच्या सर्व फेऱ्या जाहीर झाल्यानंतर मतदारांना धन्यवाद दिले. ते म्हणाले, महायुतीला कोकणात मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून यापुढे काम करणार आहे. केवळ लोकसभेपुरता नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात सर्व जागा जिंकून आणण्याचा निर्धार करतो आहे, असे म्हणाले.
काँग्रेसला यावेळी निश्चित यश मिळाले आहे. कारण यावेळी सर्व पक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले होते, तरीही देशातील जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही ही वस्तुस्थिती मान्य आहे. महविकास आघाडीने ज्या पद्धतीने ग्रामपातळीवर कार्यकर्त्यांची फळी अगदी सुरवातीपासून तयार केली. दुर्दैवाने तशी फळी तयार करण्यात आम्ही अपयशी ठरलो. यावेळी झालेल्या चुका आम्ही सुधारू, राष्ट्रवादी काँगेसने यावेळी ४ जागा लढवल्या त्यातील एकच जिंकलो. हे अपयश का मिळालं याचं आम्ही आत्मपरीक्षण करू, असे मत तटकरे यांनी मांडले.