शिवसेना (उबाठा) चे युवा जिल्हा प्रमुख अमीर उर्फ पिंटया ठाकूर यांचा आंदोलनाचा इशारा
अलिबाग, ( धनंजय कवठेकर ) : पावसाळा सुरू होवून १५ दिवसही झाले नसताना कार्लेखिंड ते वडखळ या मार्गाची खड्ड्यांमुळे वाईट अवस्था झाली आहे. लवकरात लवकर या महामार्गावरील खड्डे भरा अन्यथा तीव्र जन आंदोलन शिवसेना (उबाठा) पक्षामार्फत करण्यात येईल असा असा इशारा शिवसेना (उबाठा) चे युवा जिल्हा प्रमुख अमीर उर्फ पिंट्या ठाकूर यांनी निवेदनाव्दारे कायकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पनवेल यांना निवेदन पाठवून दिला आहे.
ठाकूर यांनी त्यांच्या निवेदनामध्ये अलिबाग- कार्लेखिंड-वडखळ हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे. २४ किमी लांबीचा हा रस्ता असून अनेक ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रवाशांना खड्डेमय रस्त्यानेच प्रवास केला आहे. मध्यंतरी काही काळ या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती परंतु आता पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अलिबागमध्ये येणा-या पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठी आहे. खड्ड्यामुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. तरीही रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी अधिकारी तयार नाहीत असा सूर जनतेमधून उमटत आहे.
अलिबाग शहराला जोडणाऱ्या वडखळ अलिबाग महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून वाहतूककोंडीच्या समस्याही निर्माण होत आहे, अशी प्रतिक्रीया अमीर ठाकूर यांनी दिली आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय आणि पर्यटन स्थळ असल्याने अलिबागला दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. या शिवाय धरमतर येथील जेएसडब्ल्यू प्रकल्प, पिएनपी पोर्टमधून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे रस्त्यावरून हजारो वाहने ये जा करत असतात. पण सध्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तिनविरा ते पोयनाड तसेच धरमतर ते वडखळ परिसरात रस्त्याला भरमसाठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे कार्लेखिंड ते वडखळ रस्त्याची झालेली दुरावस्था, त्यामुळे होणारे अपघात व जनतेला होणारा त्रास यामुळे या रस्त्याची तातडीने दुरूस्ती न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना (उबाठा) चे युवा जिल्हा प्रमुख अमीर उर्फ पिंट्या ठाकूर यांनी निवेदनाव्दारे कायकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पनवेल यांना दिला आहे.