लाचप्रकरणी तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात



लोणावळा, (श्रावणी कामत) :  सातबारा उताऱ्यावरील गिनीगवत ही नोंद कमी करून दुरुस्ती नवीन सातबारा देण्यासाठी शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागत, ही लाचेची रक्कम स्वीकारताना खांडशी गावचे तलाठी यांना कार्ला मंडल कार्यालय या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अंकुश रामचंद्र साठे (वय ४३, तलाठी खांडशी सजा, रा. खटाव, सातारा) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार, खांडशी सजा अंतर्गत असलेल्या एका शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर गिनीगवत अशी नोंद झाली होती. ती नोंद कमी करत दुरुस्ती सातबारा उतारा बनवून देण्यासाठी तलाठी साठे यांनी १० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारण्यासाठी त्यांनी कार्ला मंडल अधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्याला बोलविले होते. दरम्यान शेतकऱ्याने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने सापळा लावत तलाठी भाऊसाहेब यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. 

     या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचा आदेशान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर हे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post