ठाणे : ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ५ च्या रुंदीकरणाचे काम यशस्वीरित्या संपन्न झाले. ३६ तासाचा ब्लॉक घेतल्यानंतर दिवस-रात्र काम करून ठाण्यातील स्थानकाचे काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाले. हे काम व्यवस्थित पार पडल्यानंतर रविवारी पहिली ट्रायल ट्रेन सोडण्यात आली. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील १० आणि ११ स्थानकावरील काम देखील पूर्ण झाले असून सीएसएमटी वरून पहिली लोकल दुपारी १.१० वाजता टिटवाळासाठी सोडण्यात आली.
प्लॅटफॉर्म ५/६ च्या ५८७ मीटर लांबीच्या आणि २-३ मीटर रुंदीकरणाच्या कामासाठी ७५० प्री-कास्ट होलो ब्लॉक्सचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर ४०० मजूर, २० संघ आणि १० कंत्राटदारांच्या समन्वयाने हे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे आगामी काळात मध्य रेल्वेवरील प्रवाशांची स्थानकातील गर्दीतून सुटका होणार आहे. मात्र मध्य रेल्वेवर सर्व गाड्या १५ डब्यांची केल्यास अधिक आरामदायी प्रवास होईल अशी प्रवाशांची मागणी आहे.