उमटे धरणातील गाळाचा प्रश्‍न मार्गी लावणार


चित्रलेखा पाटील यांचा सन्मानपत्र देऊन गौरव

अलिबाग, (धनंजय कवठेकर) :  उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी संघर्ष ग्रुपने लढा सुरू केला. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि आमच्या सीएफटीआय या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला. त्यानंतर अनेकांनी पुढे येऊन मदत करण्यास सुरुवात केली. धरणातील गाळ काढण्याच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गावातील तरुणांनी एकत्र येऊन दिलेल्या या लढ्याला यश आले आहे. पुढच्या वर्षी अधिक जोमाने काम करून धरणातील गाळ काढण्याचा प्रश्‍न  कायमचा मार्गी लावणार अशी ग्वाही शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिली.

उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा समारोप आणि उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने आभाराचा  कार्यक्रम रविवारी आयोजित केला होता. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. याप्रसंगी चित्रलेखा पाटील, प्रशांत नाईक यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी महेश पाटील व इतर मान्यवर यांचा शाळ, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पुढे चित्रलेखा पाटील म्हणाल्या,महात्मा फुलेंसह काही महापुरुष त्याकाळी खुप श्रीमंत होते. मात्र त्यांनी दातृत्वाची भुमिका घेत समाजाच्या हिताचे काम केले. बांधिलकी जपत शिक्षणाची दारे खुली केली. तो विचार घेत उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी अलिबागमधील ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण एकत्र आले. त्यामध्ये अ‍ॅड. राकेश पाटील यांच्यासह अनेक तरुणांनी रात्रीचा दिवस करून काम केले. त्यांनी उमटे धरण संघर्ष ग्रुप तयार करून लढा दिला. त्यामुळे आज परिवर्तन होत असल्याचे दिसून येत आहे. या वेगळ्या लढ्यामुळे समाजात अमुलाग्र बदल होऊ शकतो. हे संघर्ष ग्रुपने दाखवून दिले आहे. आज या ग्रुपला वेगवेगळ्या संस्था, संघटनेकडून पाठींबा मिळत असल्याचा आनंद आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

यावेळी चित्रलेखा पाटील यांच्या समवेत अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचे प्रतिनिधी महेश पाटील, उमटे धरण संघर्ष ग्रुपचे प्रमुख अ‍ॅड. राकेश पाटील, माजी सरपंच मोहन धुमाळ, उद्योजक सचिन राऊळ, अ‍ॅड. सुहास कारुळकर, रुपेश पाटील, नंदेश गावंड, मनेश पाटील, तृप्ती गावंड, देवीदास थळे, विक्रांत वार्डे, अमोल नाईक, रामदास शिंदे, योगेश गुजर, प्रमोद सांदणकर, विनायक भोनकर, बाळकृष्ण गावंड, प्रितम गुंड, योगेश पाटील ,रणजीत भांजी, अक्षय डिकले आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, सीएफटीआय, उमटे दरण संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. उमटे धरणातील पाण्याच्या प्रश्‍नाबाबत गेल्या अनेक वर्षापासून लढा सुरू केला.


गाव बैठकीतून ग्रामस्थांना एकत्र आणले. शासन दरबारी पाठपुरावा केला. अखेर गाळ काढण्यासाठी  माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक चित्रलेखा पाटील,यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. या प्रयत्नांना यश आले. उमटे धरण गाळ मुक्त होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

 तृप्ती गावंड -



उमटे धरण गाळमुक्त होण्याच्या मार्गावर

उमटे धरणामार्फत तालुक्यातील १२ ग्रामपंचायत हद्दीमधील ४७ गावे, ३० हून अधिक वाड्यांना पाणी पुरवठा केला जातो. ४० हजारहून अधिक नागरिकांना या पाण्याचा आधार आहे. उमटे धरण गाळात रुतल्याने पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी हा गाळाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. गाळ काढण्यासाठी लागणारे इंधन, व यंत्रसामुग्री स्वखर्चाने उभी केली. सर्व शासकीय परवानगी घेवून १७ मे पासून ९ जूनपर्यंत हे काम अविरतपणे सुरू होते. धरणातून  हजारो ब्रास माती काढण्यास यश आले आहे. त्यामुळे उमटे धरण गाळमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.


धरणाला नवसंजीवनी मिळणार  

 अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत उमटे धरणातील गाळ काढण्यास सुरुवात केली. नुकतीच शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी धरणाला भेट दिली होती. प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील व उमटे धरण संघर्ष ग्रुपचे राकेश पाटील आणि त्यांच्या टीमचे कौतूक केले. गाळ काढण्यासाठी आता कमी वेळ मिळाला. मात्र पुढच्या काळात लवकरच गाळ काढण्याचे काम सुरु करून धरणातील गाळाचा प्रश्‍न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. त्यामुळे या धरणाला नवसंजीवनी मिळणार आहे. 




Post a Comment

Previous Post Next Post