महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेचा आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा



ठाणे, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या कोकण विभाग कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार व संघटनेचे सल्लागार निरंजन डावखरे यांना पाठिंबा देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, अशी माहिती संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष रमेश निवृत्ती जाधव यांनी दिली.

शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराम घागस, कोषाध्यक्ष देविदास नरवाडे, विभाग सचिव ज्ञानेश्वर गोसावी, राज्य कार्यकारिणी सदस्य एस. जी पाटील, विभागाचे पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष आणि सचिव सभेवेळी उपस्थित होते.

गेल्या १२ वर्षांपासून आमदार निरंजन डावखरे हे १२ वर्षांपासून पदवीधर आमदार असून शिक्षण क्रांती संघटनेचे सल्लागार आहेत. संघटनेच्या शासकीय दप्तरी कामांकरिता त्यांचे सातत्याने सहकार्य लाभत असून, त्यांना विभागातील समस्यांची संपूर्णपणे जाण आहे, असे नमूद करीत शिक्षण क्रांती संघटना पूर्ण ताकदीनिशी डावखरेंसोबत राहणार असल्याचे राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले.

इंग्रजी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवणे. तसेच सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी महालढा उभारणे आदींकडे संघटना अधिक लक्ष देणार असल्याचे सभेत ठरविण्यात आले, असे श्री. घागस यांनी सांगितले. या वेळी उत्तम कांबळे, महेंद्र जाधव, डॉ. शहाजहान मौलना, राजेंद्र गवळी, सुरेश साळवे, संदेश पाटील, योगेश वल्लाळ, थॉमस शिनगारे, प्रशांत घागस, किशोर राठोड, अनिल मुरादे, प्रा. रमेश बुटेरे, सुरेंद्रनाथ दुसाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post