ठाणे, ( आरती मुळीक परब) : दिव्याच्या आगासन गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर ठामपाने टाकलेली आरक्षणे रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचा लढा सुरू असून याबाबत ग्रामस्थांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांची पावसाळी अधिवेशनात भेट घेऊन निवेदन दिले. हे अन्यायकारक आरक्षण रद्द करण्यासाठी पालिका प्रशासनाशी चर्चा करावी, अशी मागणी आगासन गाव संघर्ष अध्यक्ष व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली.
आगासन गावातील नागरिकांच्या लढ्याला या आधीच आगरी कोळी सामाजिक संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आगासन गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी ग्रामस्थांसह आगासन गावातील अन्यायकारक आरक्षणाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांची भेट घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या कानावर टाकले.
ग्रामस्थांच्या खासगी जमिनीवर महापालिकेने मनमानी पद्धतीने आरक्षण टाकले आहे. या ऐवजी सरकारी जागा दिव्यात ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये सदर सोयी सुविधांसाठी जागा उपलब्ध करून ठेवाव्यात, अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे केली आहे. आगासान गावातील ३४.६७ एकरमध्ये बसस्थानक, मार्केट, हॉस्पिटल, विभाग कार्यालय, अग्निशमन दल, पोलीस ठाणे, जलकुंभ आणि वाहनतळ इ. एकाच ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनीवर आरक्षण टाकून अन्यायाची भूमिका घेण्यापेक्षा ज्या ठिकाणी जागा मोकळ्या आहेत व त्या पालिकेकडून आरक्षित आहेत, त्या जागा ताब्यात घेऊन जागा मालकाला योग्य तो मोबदला देऊन सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशीही मागणी निवेदनात केली आहे. त्यांच्याबरोबर आगासन गाव संघर्ष समितीचे उदय मुंडे, शिवसेना शाखाप्रमुख उ.बा.ठा. पक्षाचे अनिकेत सावंत आदी उपस्थित होते.