दिव्यातील जागरुक पालकांमुळे उघडकीस आला प्रकार
दिवा, (आरती मुळीक परब): दिवा पश्चिमेतील महापालिकेच्या शाळेमध्ये दिले जाणारे जेवण हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत पालकांनी जेवण पुरवठा करणाऱ्या ठिकाणी धडक देऊन जेवण तपासले. ते जेवण तपासल्यावर निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यावेळी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे १० ते १५ पालक उपस्थित होते.
महानगर पालिकेची शाळा सुरू होऊन अवघे १९ दिवस आज होत असताना त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढताना बघून शाळेत मिळणारे जेवण हे चांगले नाही, असे लहान मुले वेळोवेळी घरी सांगत होते. तर हे जेवण तपासण्यासाठी काही विद्यार्थ्यांच्या आई – वडिलांनी पालिका शाळेतील जेवण बनवणाऱ्या ठिकाणी जाऊन धडक दिली. तेथे जेवण तपासले असता डाळ आंबून त्याला फेस आला होता. तर भात कच्चा शिजलेला होता. तसेच तेथे लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लाडूंच्या पॅकेटवर कोणती एक्सपायरी डेट नव्हती. असे निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन आमची मुले आजारी पडतात, असा संताप पालकांनी व्यक्त केला.
हे जेवण बनवताना एका निळ्या टाकीत भरलेले अशुध्द पाणी वापरले जात असून कॉनफ्लॉवर, बेसन डाळ घट्ट करण्यासाठी वापरण्यात येत आहे. तर डाळ, उसळी बनवण्यासाठी पाम तेलाचा वापर केला जात आहे. या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी रेशनचा तांदूळ वापरल्याने तो ही कच्चा शिजवला जातो. हे असे निकृष्ट दर्जाचे अन्न खाऊन मुले आजारी पडत आहेत. दिव्यातील पालिका शाळेतील निकृष्ट जेवण देऊन पालिका आमच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करत आहे, असे बोलून पालकांनी नाराजी व्यक्त केली.
या जेवणात केस, झुरळ, भांडी घासायच्या काथ्याची तार सापडल्याने काही मुले शाळेतील अन्न जेवतच नाहीत. यावर पालकांनी शिक्षकांना तक्रार दिली असता, आम्ही ठेकेदाराला सांगतो ऐव्हढेच सांगतात. पण त्या जेवणात काहीच बदल होत नाहीत. या जेवणामुळे मुलांमध्ये पोटदुखी, उलटी, जुलाब, घशाला खवखव होणे, मळमळणे असे आजार होत आहेत.
जर आमच्या मुलांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाणार असेल अन् त्यामुळे आमची मुले आजारी पडणार असल्यास हे निकृष्ट दर्जाचे शासनाचे जेवण आमच्या मुलांना नको अशी भूमिका यावेळी पालकांनी मांडली. श्रावणी कदम, जानवी परब, सुवर्णा बांदेकर, उदय कांबळे, दिलीप शिगम यांसह इतर पालक यावेळी उपस्थित होते.
निकृष्ट दर्जाचे जेवण लहान मुलांना पुरवून त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मी पत्र देऊन शिक्षण विभागाला करणार आहे. जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचे असून दिव्यातील एका गाळ्यात हे जेवण बनवले जाते.त्यासाठी अशुद्ध पाणी वापरले जाते. बेसनचे पीठ व कॉर्नफ्लॉवर वरण घट्ट होण्यासाठी वापरले जाते. तांदूळही अर्धवट शिजलेले असतात. मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.अनेक पालकांच्या तक्रारी याबाबत आहेत, प्रशासनाने यावर वेळीच कारवाई करावी. हा ठेकेदार बदलून दिव्यातील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण पुरवले जावे.
ज्योती पाटील, दिवा शहर संघटीका, शिवसेना उबाठा
गेले ८ ते १० दिवस माझ्या मुलांना घरी आल्यावर पोट दुखी, उलटी झाली. शाळेतून आल्यावर नाश्ता, जेवण नको असे मुले सांगू लागली. तेव्हा मुलांनी शाळेतील जेवण खराब असते असे सांगू लागली. जेवणात झुरळ, केस , काथ्याची तार मिळाली, असे ही मुलांनी घरी सांगितले. यानंतर शिक्षकांना तक्रार केली असता त्याचा काहीच फायदा झाला नाही. मग मी इतर पालकांना सांगून जेवण बनवणाऱ्या जागू जाऊयात असे ठरवून आम्ही त्याठिकाणी धडक दिली. हे मुलांचे जेवण एका इमारतीच्या गाळ्यात बनवले जात आहे. तो भाग चाळींच्या मागची जागा असून तेथे गटार घाण पडलेली आहे. तेथेच हे जेवण बनवले जात आहे.
श्रावणी संतोष कदम, पालक


