टिटवाळ्यातील रुक्मिणी प्लाझा प्रसुतीगृहास भेट
डोंबिवली ( शंकर जाधव ) : महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या टिटवाळा (पूर्व) येथील रुक्मिणी प्लाझा प्रसूतीगृहास भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेतला व रुग्णांची विचारपूस केली. त्यावेळी रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या सर्वसमावेशक आरक्षणाअंतर्गत उपलब्ध झालेल्या इमारतीमध्ये महिलांसाठी प्रसूतीगृह हे जून २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. सदर प्रसूतीगृह एकूण ५० बेडचे असून संपूर्ण रुग्णालय बाह्य संस्थेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून चालविण्यात येते. सदर रुग्णालयांमध्ये प्रसूती विषयक सर्व सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. या ठिकाणी प्रयोगशाळा सुविधा तसेच सोनोग्राफी सुविधा या सेवा प्रसूतीच्या रुग्णांसाठी मोफत उपलब्ध आहेत.
अद्यापपर्यंत सदर रुग्णालयामध्ये एकूण १६२४९ महिलांनी बाह्यरुग्ण विभागात तर २२०७ रुग्णांनी आंतररुग्ण सुविधेचा लाभ घेतला आहे. तसेच अद्याप पर्यंत सातशे पाच सामान्य प्रसूती तसेच २११ सिझेरियनद्वारे प्रसूती झालेल्या आहेत तसेच एकूण ४८ रुग्णावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी पाहणी करतेवेळी रुग्णालयाबाहेर दिशादर्शक फलक लावणे, श्रीगणेश मंदिरापासून रुग्णालयापर्यंत पथ दिव्यांची व्यवस्था करणे, महिला रुग्णांच्या सुविधेसाठी रुक्मिणी प्लाझा प्रसुतीगृहापर्यंत चांगला रस्ता बनविणे व त्याचप्रमाणे या रुग्णालयातून प्राप्त होणा-या/झालेल्या सुविधांबाबत अभिप्राय (Feedback) देण्याकरीता क्युआर कोड (QR Code) लावणेबाबत निर्देश दिले.
यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, परिमंडळ-१ चे उपायुक्त प्रसाद बोरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दिपा शुक्ला, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, घन:शाम नवांगुळ, सुरेंद्र टेंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.समिर सरवणकर व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.