अलिबाग, (धनंजय कवठेकर) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २७ जुलै रोजी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातीत तडजोडीस पात्र प्रकरणे, प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निकाली काढण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांनी दिली. सुमारे ५० हजार प्रकरणे या लोकअदालतीसमोर ठेवली जाणार आहेत.
या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातीत प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. सुमारे ५०हजार प्रकरणे या लोकअदालतीसमोर ठेवली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजन केले आहे, या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांनी केले आहे.