राधानगरी धरण ९४ टक्के भरले
काेल्हापूर शहरवासी पुराच्या उंबरठ्यावर
काेल्हापूरः काेल्हापूर जिल्ह्यात व विशेषतः धरण परिसरात पावसाची मुसळधारा सुरुच असून, जिल्ह्यातील एकूण ८१ बंधारे पाण्याखाली असून, राधानगरी धरण देखील गुरुवार सकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज पाटबंधारे विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे बुधवारी पंचगंगा नदीने धाेक्याची पातळी ओलांडली असून, राधानगरी धरण ९४ टक्के भरले आहे. काेल्हापूरमध्ये पुराची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी बुधवारी रात्री इशारा पातळीवर म्हणजेच ३९ फुटावर असून, धाेका पातळी ही ४३ फूट आहे.
बुधवारी रात्री राधानगरी धरणातून ६२३१३ क्युसेक पाणी साेडण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला सतत सुरू असलेल्या मुसळधारामुळे शहर परिसरात पाणी साचलेले दिसत हाेते. तर रस्त्यावरून जाताना रस्ता कमी खड्डेच जास्त दिसत असल्याने महापालिका प्रशासनविराेधात वाहनचालक तसेच रहिवाशांनी तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला.
![]() |
राधानगरी धरण |
बुधवारी देखील काेल्हापूर जिल्ह्यात पावसाची जाेरदार बँटींग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सध्या पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीच्या उंबरठ्यावर असल्याचे पहावयास मिळत आहे. दुसऱ्या बाजूला पुराची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे जिल्हा व महापालिका प्रशासन सज्ज झाले असून, संभाव्य पूरस्थिती जाणून नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात येत आहे. नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. दरम्यान कोकणला जोडणारा कोल्हापूर रत्नागिरी हा महामार्ग केर्लीजवळ बंद करण्यात आला आहे, पर्यायी मार्गाने या वाहतूक सुरू आहे. दुसरीकडे कसबा बावडा सीए मार्गावर देखील पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे.
पावसाचा असाच मारा सुरू राहिल्यास, गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिराेळ येथेही श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेले असून, कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढल्यास नागरी वस्ती पाणी शिरण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण वाढत असल्याने नदीच्या पात्रामध्ये पाण्याची झपाट्याने वाढ होत असल्याने, नदीकडच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन भोगावती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहे. काळमवाडी धरण ७० टक्के तर तुळशी धरण ८० टक्के भरले आहे.