डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील भूमिका नेमाडे आणि ईशान पुथरन यांनी २४ ते २८ जुलै दरम्यान कावासाकी येथे झालेल्या आशियाई रोप जंप चॅम्पियनशिप २०२४ मध्ये रौप्य पदक जिंकून भारताला गौरव मिळवून दिला आहे. या दमदार जोडीने सिंगल रोप डबल अंडर रिले - ज्युनिअर मिक्स्ड कॅटेगिरीमध्ये चिनी संघाला मात दिली. या स्पर्धेत थायलंड संघाने सुवर्णपदक जिंकले.
ईशान आणि भूमिका हे भारतीय रोप जंप समुदायातील आघाडीचे खेळाडू असून, त्यांनी थायलंड आणि यूएसएमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये, तसेच २०२३ मध्ये झालेल्या प्रतिष्ठित वर्ल्ड जंप रोप चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत.त्यांच्या वैयक्तिक यशाबरोबरच, नेमाडे आणि पुथरान यांनी आणखी एका टीम इव्हेंटमध्ये, सिंगल रोप स्पीड रिले - ज्युनिअर मिक्स्ड मध्ये देखील भाग घेतला. दोन इतर सहकाऱ्यांसह, त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली पण पदकाच्या दृष्टीने थोडेसे मागे पडले आणि चौथ्या क्रमांकावर राहिले.
या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये उच्चतम पातळीची क्रीडाशक्ती आणि प्रदर्शन पाहायला मिळाले. खेळ खरंच वेगळ्या पातळीवर होता. ही स्पर्धा खूप आव्हानात्मक होती, पण या खेळाडूंनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार मानली नाही, त्यामुळेच त्यांनी भारतासाठी रौप्य पदक मिळवले असे त्यांच्या प्रशिक्षक अमन वर्मा म्हणाले. स्वतः माजी खेळाडू असलेले वर्मा या चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.नेमाडे आणि पुथरन यांच्या या रौप्य पदकाच्या विजयाने त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीत भर घातली असून, आंतरराष्ट्रीय रोप जंप क्षेत्रात भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आहे.