कल्याण, (शंकर जाधव) : कल्याण- डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन समारोह आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांचे शुभहस्ते ध्वजारोहणाने संपन्न झाला. यावेळी राष्ट्रगीतानंतर राज्य गीताची ध्वनिफीत वाजविण्यात आली. तद्नंतर हुतात्मा स्मारकास वंदन करून घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांचेसह सर्व उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली ,यावेळी महात्मा फुले, मनपा शाळा क्र.६८, कल्याण या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या देशभक्तीपर समूह गीताने सर्व वातावरण देशभक्तीने भारून गेले. उपस्थित विद्यार्थी वर्गास हिंदू यंग वर्ल्ड या वृत्तपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच तन्वी कौस्तुभ घारपुरे या विद्यार्थिनीचा बॅडमिंटनमध्ये राज्यस्तरावर नेत्रदीपक कामगिरी बजावल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत १० प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्र देण्यात आले.
महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांचे शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. तद्नंतर डोंबिवली येथील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलातील कॅ. विनयकुमार सचान स्मारकास महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कॅप्टन विनयकुमार सच्चान यांचे माता पिता, पद्मश्री पुरस्कार विजेते गजानन माने, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड तसेच महापालिकेचे इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
तदनंतर डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक येथील दीडशे फुटी उंच ध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले. १९४७ साली भारताला मिळालेल्या स्वातंत्र्य लढ्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या, देशासाठी प्राणपणाने लढलेल्या शहीदांचे, स्वातंत्र्यवीरांचे कृतज्ञतेने स्मरण करण्याचा हा दिवस आहे असे सांगत आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांना तसेच नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी पालिका सदस्य मोहन उगले, सुधीर बासरे, इतर पालिका सदस्य, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, इतर पदाधिकारी महापालिका अधिकारी,वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.